Close

Copy and paste

जपान “हरला” पण जपान “जिंकला” ,
चला आपणही शिकूया जपान्यांकडून “To Respect The Nation & Its Values”….

सध्या रशियात सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप सामन्यात जपान-बेल्जीअम या या वर्ल्डकप मधल्या आत्तापर्यंतच्या सर्वात रोमांचक ठरलेल्या सामन्यात जपानने जिगरबाज खेळ करत बेल्जीअम संघावर सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतली आणि स्टेडीयममधल्या हजारो जपानी फॉलोअर्सनी दंगा करत स्टेडियम डोक्यावर घेतले.

पण फुटबॉल या निर्दयी खेळाच्या प्रथेला अनुसरून बेल्जिअम संघाने फुटबॉल या खेळातल्या सर्वोत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत हा सामना सलग ३ गोल्स करत ३-२ अश्या फरकाने जिंकला.

काही काळापूर्वी बेल्जीअम सारख्या ताकतवान संघावर जपानच्या आघाडीमुळे आनंदाच्या शिखरावर उधाण बरसवणारे जपानी प्रेक्षक शेवटच्या अर्ध्या तासात मात्र आपल्या देशावर नितांत प्रेम असल्याने आणि जपानचा पराभव झालेला दिसत असल्याने अक्षरशः धाय मोकलून रडू लागले.

सामना संपला, खेळाडू त्यांच्या त्यांच्या ड्रेसिंगरूममध्ये परतले……बेल्जीयम फॉलोअर्स सुद्धा हर्षोल्हासात घरी परतले…

“”……आणि आता सुरु केली जपानी फॉलोअर्सनी जग जिंकण्याची मोहीम….””

स्वतःचा प्राणप्रिय जपान देश हरल्याने निराशेच्या आणि दुःखाच्या खोल गर्तेत असून सुद्धा, रशियातल्या रोस्तोव्ह अरेना क्रीडांगणावर सामना सुरु असताना जवळपास ४२,००० दर्शकांनी केलेला उन्मादी कचरा आता या जपानी फॉलोअर्सनी पूर्ण स्टेडियम मध्ये फिरून साफ करायला सुरुवात केली.

हा कचरा साफ करताना केवळ जपान्यांनी स्वतः केलेलाच कचरा नव्हे तर बेल्जीअम संघाचे ध्वज, त्यांचे कागदी आणि कापडी फलक, त्यांचे रंगीबेरंगी कपडे, त्यांच्या शीतपेयांची रिकामी खोकी, बेल्जीअम राष्ट्रध्वजाचे केलेले फेसमास्क्स या सर्व गोष्टी सुद्धा जपानी फॉलोअर्सनी आपल्यासोबत आणलेल्या भल्यामोठ्या पिशव्यांमध्ये भरायला सुरुवात केली.

जपानी फॉलोअर्समध्ये लहान मुले होती, तरुण मुले-मुली आणि वयस्कर आजोबा आणि आज्या यांचे प्रमाण सुद्धा लक्षणीय होते.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्या प्रकारात कुणीच ‘लीडर’ नव्हता हे विशेष…..

सर्व जपानी फॉलोअर्स ‘सुओमोटो’ (स्वयंप्रेरणा) पद्धतीने काम करत होती.

डोळ्यांतून आसवांची धार लागली होती, झालेल्या निराशाजनक पराभवाने डोकी जड झाली होती तरीपण मुळात कचरा करायचा नाही पण जर खेळाच्या उन्मादात कचरा केलाच तर आपण केलेला कचरा आणि त्यासोबत इतरांनी सुद्धा केलेला कचरा आपणच स्वयंशिस्तीने साफ करायचा.

परदेशात तर जिथे आपल्या प्राणप्रिय देशाचे नाव थेट जोडले जाते तिथे तर हे काम जास्त मन लावून करायचे या मूळ शिकवणीने आणि या लहानवयातचं मिळणाऱ्या संस्कारांनी प्रगल्भ झालेल्या जपानी फॉलोअर्सनी या त्यांच्या नैसर्गिक सवयीने जगभरातल्या वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या अक्षरशः कौतुकाच्या हेडलाईनस मिळवल्या.

हे झालं फॉलोअर्सचं ज्याचं प्रत्यक्ष क्रीडांगणावर तसं म्हटलं तर काही स्थान नव्हतं.

२-० आघाडी घेतलेल्या पण तरीही ३-२ गोल फरकाने अत्यंत महत्वाचा सामना हरलेल्या जपानी खेळाडूंचे काय?

आपल्या प्राणप्रिय देशासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा सामना हरल्यावर अनेक जपानी खेळाडू मैदानावरच उन्मळून धाय मोकलून रडत रडत कोसळले. कालांतराने खेळाच्या प्रथेप्रमाणे जिंकलेल्या बेल्जीअमच्या खेळाडूंचे अभिनंदन करून हे सर्व जपानी खेळाडू आपल्या रेस्ट रूम मध्ये पोचले.

आणि आता मात्र निराशेच्या त्या अतीव दु:खद प्रसंगात सुद्धा स्वतःला प्राणप्रिय असलेल्या आपल्या जपान देशाची प्रतिमा त्याही परिस्थितीत त्यांनी जगासमोर ताठ मानेने उंचावणारी कृती आता केली.

आपले ड्रेसिंगरूम सोडताना तिथल्या, त्यांनी या सामन्यांत वापरलेल्या बाथरूम सकट इतर सर्व गोष्टी चकचकीत धुवून स्वच्छ केल्या, कोरड्या केल्या आणि इतकंच नव्हे तर आपल्याला ती ड्रेसिंगरूम जशी मिळाली होती तशीच क्लीन करून वर आणि रशियन भाषेत ‘स्पासिबो’ म्हणजेच ‘धन्यवाद’ अशी पाटी या स्पर्धेच्या यजमान रशीयनांसाठी सुद्धा स्वहस्ताक्षरात लिहून ठेवली.

धन्य तो जपान देश आणि आपल्या देशाचे नाव जगभरात मानाने घेतले जावे यासाठी नित्यनिरंतर प्रयत्न करणारे धन्य ते जपानी नागरिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *