शैक्षणिक संशोधन (Educational Research)

By | April 14, 2020

ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाट्याने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत तत्त्वे, नियम इत्यादींचा शोध घेण्याचे काम शिक्षणशास्त्राच्या ‘शैक्षणिक संशोधन’ या शाखेत चालते. मानवी जीवन सुसंस्कृत करण्याकरिता शैक्षणिक संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक वा शासनाधिकारी यांना आपापल्या कार्यात सुधारणा करता यावी व परिणामकारकता साधता यावी, हाच त्या संशोधनामागे हेतू असतो.

व्याख्या : शैक्षणिक संशोधन या संकल्पनेची सर्वमान्य व्याख्या करणे कठीण आहे; कारण मुळात शिक्षण या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. पुढे दिलेल्या काही व्याख्यांच्या आधारे शैक्षणिक संशोधन ही संकल्पना समजण्यास मदत होईल.

 • १९८० सालच्या इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ एज्युकेशन या ग्रंथानुसार ‘सर्वसामान्य मानव्य शाखा व सामाजिक शास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींचा वापर करून वेगवेगळ्या शाखांमधील शिक्षणसिद्धांतांच्या संदर्भात, अन्वेषणाद्वारे करण्यात येणाऱ्या शैक्षणिक पद्धती व प्रक्रिया यांच्या अभ्यासाला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात’.
 • ट्रॅव्हर्स यांनी १९७८ मध्ये केलेल्या व्याख्येनुसार, ‘अधिशिक्षकांना (एज्युकेटर) रस असणाऱ्या मुद्यांशी संबंधित अशा घटनांबाबत शास्त्रीय ज्ञानाच्या संयोजित अंगांचा विकास करण्याच्या प्रकियेला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात’.
 • १९७३ सालच्या डिक्शनरी ऑफ एज्युकेशन या ग्रंथानुसार ‘शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन असे म्हणतात’.
 • जेकन्स ॲरी आणि रझाविच यांनी १९७२ मध्ये केलेल्या व्याख्येनुसार, ‘ज्या वेळी शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो, त्या वेळी शैक्षणिक संशोधन घडून येते’.
 • मौली यांनी १९५८ मध्ये केलेल्या व्याख्येनुसार, ‘शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक असलेले तथ्य व सबंध यांचा शोध घेण्यासाठी हाती घ्यावयाच्या कृतीची मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय’. एकंदरीत ‘शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्ट्ये, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनपद्धती, मूल्यमापन, विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक साहित्य, तंत्र, पाठ्यपुस्तके इत्यादींपैकी एक वा अनेक शैक्षणिक घटकांच्या संदर्भांत निर्माण झालेल्या अथवा होणाऱ्या समस्यांचे शास्त्रशुद्धपद्धतीने उत्तर शोधण्याचा केलेला वा करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे शैक्षणिक संशोधन होय’. शिक्षणाशी संबंधित अशा घटनांची हाताळणी व पूर्वकथन करणे आणि वर्तमानस्थितीशी संबंधित सामान्य तत्त्वे किंवा नियम शोधून काढणे, हा शैक्षणिक संशोधनाचा हेतू असतो.

शैक्षणिक संशोधनाचा विकास : शिक्षणशास्त्रातील संशोधनाचा काळ हा अगदी अलीकडचा आहे. इ. स. १९०० च्या आधीचे काही शिक्षणविषयक अभ्यास शैक्षणिक संशोधनात अंतर्भूत करता आले, तरीही या शाखेचा विकास विसाव्या शतकात घडून आला. शिक्षणविषयक संशोधनाचा आरंभ यूरोपमध्ये, प्रामुख्याने जर्मनीत झाला. व्हिल्हेल्म व्हुंट (Wilhelm Wundt) या शास्त्रज्ञांनी १८६१ मध्ये आपल्या संशोधनात्मक प्रयोगाला सुरुवात केली व १८७९ मध्ये बर्लिन विद्यापीठात प्रयोगशाळा स्थापन केली. एबिंगहाऊस आणि म्यूमन यांच्या स्मरणव्यापारविषयक संशोधनालाही खूप महत्त्व दिले जाते. अमेरिकेतील टिचनर, कॅटेल इत्यादी संशोधकांची पिढी व्हुंट आदी यूरोपीय संशोधकांच्या हाताखालीच तयार झाली होती. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात थॉर्नडाइक व जे. एम. राईस यांनी केलेले कार्य विशेष मौलिक मानले जाते. थॉर्नडाइक यांचे संशोधन ज्ञानार्जनाच्या प्रकियेसंबंधीचे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जी. स्टॅन्ली हॉल यांनी बालकांचा विकास व कुमार वयातील मुलामुलींच्या गरजा व प्रवृत्ती यांचे केलेले संशोधन असेच महत्त्वाचे आहे. अमेरिकेत शिक्षणविषयक संशोधनात विद्यापीठे, शिक्षकांच्या व्यावसायिक संघटना व कार्नेजी, फोर्ड, रॉकफेलर इत्यादी धनिकांनी निर्माण केलेली प्रतिष्ठाने या सर्वांचा पुढाकार आहे. शिक्षणाच्या अंगोपांगांसंबंधी नवनव्या समस्यांवर अमेरिकेत सदैव संशोधन सुरुच असते.

इंग्लंडमध्ये १९८८ पासून सर फ्रान्सिस गॉल्टन (Sir Francis Galton) यांच्या आनुवंशिकतेसंबंधीच्या संशोधनाने या कार्यास आरंभ झाला. फान्समध्ये आल्फ्रेड बीने  (Alfred Binet) यांनी बुद्धिमापन कसोट्यांसंबंधी जे संशोधन सुरू केले, त्याचा प्रसार ब्रिटनमध्ये झपाट्याने झाला. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंसंबंधी तेथे खूपच संशोधन झाले आहे. देशातील सर्व संशोधनकार्याचे संशोधन करणारी ‘नॅशनल फाउंडेशन फॉर एज्युकेशनल रिसर्च’ ही संस्था तेथे आहे.

रशियाच्या शिक्षणपद्धतीतही संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. तेथे १९४३ मध्ये ‘ॲकॅडेमी ऑफ पेडगॉगिकल सायन्स’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेत विशेषतः मानसशास्त्र व अध्यापनपद्धती यांविषयीच्या संशोधनावर भर आहे. या अकादमीचे कार्य निरनिराळ्या नऊ संस्थांमार्फत चालते. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, अपंगांचे शिक्षण, भाषाशिक्षण इत्यादी विषयांना या संस्था वाहिलेल्या आहेत.

जपानसारख्या छोट्या राष्ट्रातही राष्ट्रीय पातळीवरून संशोधनाचे कार्य चालते. शिक्षणविषयक संशोधनासाठी तेथे अनेक संस्था व नियतकालिके शैक्षणिक कार्याला वाहिलेली आहेत. इटली, कॅनडा, न्यूझीलंड इत्यादी लहानमोठ्या देशांतही शिक्षणविषयक संशोधन प्रतिष्ठा पावले आहे. ऐतिहासिक दृष्टीने या विकासाचे पुढील पाच टप्पे मांडता येतील.

पहिला कालखंड (१९०० पर्यंत) : पूर्वी शैक्षणिक संशोधन प्रायोगिक अध्यापनशास्त्र या नावाने ओळखले जाई. म्यूमन, बीने, सीमोन, थॉर्नडाइक या व इतर काही संशोधकांना प्रायोगिक अध्यापनशास्त्राचे प्रवर्तक मानले जाते. या कालावधीत झालेले बरेचसे संशोधन मानसशास्त्राशी निगडित होते. अध्ययनप्रकियेतील साहचर्याचे महत्त्व (एबिंगहाऊस), मानसिक कसोट्या (कॅटेल, राईस), तापमान, थकवा यांसारख्या घटकांचा कृतीवर होणारा परिणाम इत्यादी विषयांत संशोधनपर अभ्यास करण्यात आला.

दुसरा कालखंड (१९०० – १९३०) : या कालावधीत झालेले बरेचसे संशोधन प्राधान्याने संख्यात्मक स्वरूपाचे होते. या काळात मानसिक कसोट्या मोठ्या प्रमाणावर तयार झाल्या. त्यांचा वापर सर्वेक्षणे, अभ्यासक्रम विकास व मूल्यमापन यांसारख्या क्षेत्रांत करण्यात आला.

तिसरा कालखंड (१९३० – १९५०) : हा कालखंड संशोधनाच्या दृष्टीने मौलिक मानला जात नाही. या काळात जागतिक मंदीमुळे संशोधनाकरिता निधीची कमतरता होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे यूरोपमध्ये व त्यानंतर अमेरिकेतही अशांतता होती. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात फारसे संशोधन घडून आले नाही; मात्र नंतर परिस्थिती थोडी सुधारू लागली. या कालखंडात सामाजिक विषमतेबाबत शाळेची भूमिका, पौगंडावस्थेतील विकास यांसारख्या विषयांवर संशोधन करण्यात आले.

चौथा कालखंड (१९५० – १९७०) : या कालावधीत शैक्षणिक संशोधनाला खरा बहर आला. अनेक देशांमध्ये शासनाने शैक्षणिक संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. ज्ञानविस्फोट प्रकियेचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रावरही झाला. परिणामी शिक्षणविषयक अभ्यासाची अनेक नवीन क्षेत्रे उदयाला आली. संख्यात्मक संशोधनाला पर्याय म्हणून गुणात्मक संशोधन पद्धतींकडे पाहिले जाऊ लागले. प्याजे, क्रोनबॅक, कँपबेल यांसारख्या शास्त्रज्ञांनी संख्यात्मक पद्धतींना विरोध केला. निकष, संदर्भ कसोट्या, अध्यापक-विद्यार्थी आंतरक्रिया विश्लेषण, अध्यापक परिणामकारकता, सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्या मागासवर्गीय गटांकरिता पूरक शिक्षण, अध्ययन अभिक्षमतेचे सामाजिक पैलू यांसारख्या विषयांत संशोधन झाले.

पाचवा कालखंड (१९७० नंतर) : या कालखंडात शैक्षणिक संशोधनाची क्षितिजे आणखी रूंदावत गेली. प्रौढ शिक्षण, मुक्त व दूरशिक्षण, लोकसंख्या व पर्यावरण शिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण, विशेष शिक्षण, वंचितांचे शिक्षण यांसारखी नवी क्षेत्रे विकसित होऊन त्यांत संशोधन होऊ लागले आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञानातील विकासामुळे शिक्षणक्षेत्रातही बदल घडून येत आहेत.

शैक्षणिक संशोधनाची उद्दिष्ट्ये :

 • शिक्षणश्रेत्रातील नवनवीन संकल्पना व सिद्धांत यांचा शोध लावून त्यासंबंधातील परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे.
 • अस्तित्वात असलेल्या जुन्या संकल्पनांचा संशोधनाच्या साहाय्याने नवा अर्थ शोधणे.
 • शैक्षणिक संशोधनातून ज्ञानात भर पाडणे.
 • संशोधनाच्या साहाय्याने शिक्षण क्षेत्रातील काही तथ्यांमधील सत्याचा शोध घेणे.
 • शैक्षणिक संशोधनातून ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेऊन जीवन समृद्ध करणे.
 • शैक्षणिक संशोधनाद्वारे  भविष्यातील शिक्षणपद्धतीसंदर्भात अनुमान काढणे इत्यादी.

शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये : वस्तुनिष्ठता, अचुकता, खंडनक्षमता, सिद्धांताचे निष्पादन, अनुभव प्रामाण्यवाद, तार्किक विवेचन, संभाव्यताप्रधान विचारसरणी इत्यादी शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत.

शैक्षणिक संशोधनाच्या पायऱ्या : शैक्षणिक संशोधनाची प्रक्रिया ही समस्येची निवड करणे, परीकल्पनेची संरचना करणे, माहिती संकलन करणे, निष्कर्षाचा अहवाल करणे, संशोधन समस्या, अभ्यासाची पद्धत, माहितीचे संयोजन व अर्थनिर्वचन, निषकर्षांचा अहवाल इत्यादी विशिष्ट पायऱ्यांनुसार होत असते.

शैक्षणिक संशोधनाचा विकास, भारतातील : स्वातंत्र्यपूर्व काळात येथील ब्रिटिश सरकारने शिक्षणक्षेत्रातील संशोधनाला फारसे महत्त्व दिले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये शैक्षणिक संशोधन हे सापेक्षत: नवीन क्षेत्र आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक संशोधनाच्या आवश्यकतेची जाणीव निर्माण झाली. त्याचप्रमाणे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या सामाजिक विज्ञानांचा विकास झाल्याने त्यांतील सिद्धांतांचे शिक्षणक्षेत्रातील उपयोजन लक्षात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन केवळ विद्यापीठांच्या अखत्यारीत होते. १९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठ आयोगाने प्रत्येक विद्यापीठांमध्ये एक प्राध्यापक व अधिव्याख्याता नेमून शिक्षणविभाग सुरू करण्याची शिफारस केली. १९३६ मध्ये मुंबई विद्यापीठात एम. एड.चा वर्ग सुरू करण्यात आला. उत्तरोत्तर अनेक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम चालू झाला. या अभ्यासक्रमात संशोधनकार्य आवश्यक करण्यात आले. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाने शिक्षणशाखेत पीएच. डी.चा अभ्यासक्रम सुरू केला. १९४३ मध्ये शिक्षणशाखेतील पहिली डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तोपर्यंत शिक्षणक्षेत्रात झालेले संशोधन फारसे पद्घतशीर झालेले नव्हते, असे १९४९ मध्ये विद्यापीठ-शिक्षण-आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार दिसते.

निधीच्या उपलब्धतेवर मर्यादा असल्याने संशोधनविषयाची व्याप्तीही मर्यादित होती. शिक्षणविषयक संशोधनाला चालना मिळावी, या हेतूने १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ ही संस्था केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली. १९५० नंतर शैक्षणिक संशोधनात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. शिक्षणशाखेत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन होऊ लागल्या. १९५४ मध्ये ‘सेंट्रल ब्यूरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च’ (पाठ्यपुस्तकांच्या संशोधनासाठी) व ‘सेंट्रल ब्यूरो ऑफ एज्युकेशन अँड व्होकेशनल गाइडन्स’ या संस्थांची स्थापना झाली. यानंतर १९५६ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्यूकेशन’ आणि ‘नॅशनल फंन्डामेंटल एज्युकेशन सेंटर’ तसेच १९५९ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑडिओ व्ह्युज्युअल एज्युकेशन’ या संस्थेची स्थापना झाली. १९६१ मध्ये ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ (N. C. E. R. T.) ही संस्था सुरू झाली. या संस्थेच्या अनेक समित्या वा शाखा असून शिक्षणाच्या विविध अंगांचे संशोधनकार्य त्यांमार्फत चालते. ⇨ कोठारी आयोगाच्या अहवालामध्ये विद्यापीठांतून मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्यासाठी शिफारशी करण्यात आल्या. विद्यापीठांच्या मार्गदर्शनाखाली तीन-चार स्थानिक महाविद्यालयांनी सहकारी पद्धतीने संशोधन करावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा असणाऱ्या महाविद्यालयांची निवड करावी, विद्यापीठांनी ८० टक्के संशोधनाची जबाबदारी घ्यावी, यासाठी शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात यांसारख्या महत्त्वपूर्ण शिफारशींमुळे शैक्षणिक संशोधनक्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’(I. C. S. R.) या संस्थेतही शिक्षणशाखेतील विषयांवर संशोधन केले जाते. १९८६ मधील शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण व कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनुसार १९९३ मध्ये ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन’ या संस्थेची स्थापना झाली. आज शैक्षणिक संशोधने ही विद्यापीठ, शासकीय स्तर, स्वायत्त खाजगी संस्था, व्यावसायिक संघटना व व्यक्तिगत पातळी इत्यादी स्तरांवर केली जातात.

शैक्षणिक क्षेत्रातील आंतरशाखीय दृष्टिकोन : शिक्षणक्षेत्रातील अनेक घटनांचा अभ्यास सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या संदर्भात करणे आवश्यक असते. यासाठी इतर सामाजिक शास्त्रांचे ज्ञान व सिद्धांत यांचा उपयोग आवश्यक ठरतो. म्हणूनच शैक्षणिक संशोधनाचे स्वरूप आंतरशाखीय असणे आवश्यक आहे. भारतात आंतरशाखीय शैक्षणिक संशोधनावर कोठारी आयोग आणि एन.सी.ई.आर.टी. या संस्थेचा बराच प्रभाव दिसून येतो. १९६०च्या सुमारास एम. एस. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे समाजशास्त्र या विषयात संशोधन झाले. त्याचप्रमाणे शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयात तापस मुजुमदार, नल्ल गौडेन, पी. आर. पंचमुखी यांसारख्या संशोधकांनी काम केले. आय.सी.एस.एस.आर. या संस्थेच्या स्थापनेनंतर आंतरशाखीय संशोधनाला अधिक वाव मिळाला.

शैक्षणिक संशोधनाचे क्षेत्र : शिक्षणक्षेत्राची विविध अंगे आणि त्याच्याशी संबंधित घटक, हे शैक्षणिक संशोधनासाठी योग्य अभ्यासविषय होऊ शकतात. १९७२ पर्यंत शिक्षणक्षेत्रात झालेले संशोधन एम. बी. बुच यांच्या संपादनाखाली ए सर्व्हे ऑफ रिसर्च इन एज्युकेशन या ग्रंथाच्या पहिल्या भागात संकलित केले आहे. बुच यांनीच संपादित केलेले पुढील चार भाग एन.सी.ई.आर.टी. या संस्थेने प्रकाशित केले आहेत. पाचव्या भागात १९९२ पर्यंतच्या संशोधनाच्या नोंदी आहेत. या भागात एकंदर ७२९ नोंदी असून त्यांचे सुमारे ४० क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले आहे. शिक्षण संचालनालयात व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातही संशोधन विभाग उघडण्यात आलेले असून संख्यात्मक संकलन व त्यावरून निष्कर्ष काढण्याचे कार्य सुरू असते. यूनेस्कोच्या सहकार्यानेही काही संशोधनात्मक प्रकल्प हाती घेतले जातात. तसेच सर्वसामान्य शिक्षकांनी दैनंदिन कार्यातील समस्यांबाबत संशोधन करावे, असेही प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.

शैक्षणिक संशोधनाची विषयक्षेत्रे

१) शैक्षणिक तत्त्वज्ञान२१) अध्यापन
२) शिक्षणाचा इतिहास२२) शैक्षणिक व्यवस्थापन
३) शिक्षणाचे समाजशास्त्र२३) अनौपचारिक शिक्षण
४) तुलनात्मक शिक्षण२४) पौढ शिक्षण
५) शिक्षणाचे अर्थशास्त्र२५) पूर्व प्राथमिक शिक्षण
६) शिक्षणाचे मानसशास्त्र२६) प्राथमिक शिक्षण
७) सर्जनशीलता व अन्वेषण२७) माध्यमिक शिक्षण
८) शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन२८) व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण
९) शैक्षणिक कसोट्या व मापन२९) विशेष शिक्षण
१०) शैक्षणिक नियोजन व धोरण३०) उच्च शिक्षण
११) अभ्यासक्रम३१) स्त्री शिक्षण
१२) भाषा शिक्षण३२) वंचितांचे शिक्षण
१३) समाजशास्त्र शिक्षण३३) ज्ञानरचनावादी शिक्षण
१४) गणित शिक्षण३४) सामाजिक प्रक्रिया
१५) विज्ञान शिक्षण३५) समावेशक शिक्षण
१६) शैक्षणिक तंत्रविज्ञान३६) प्राविण्याचे सहसंबंध
१७) मानसिक आरोग्य३७) शैक्षणिक मूल्यमापन व परीक्षा
१८) लैंगिक शिक्षण३८) जीवन शिक्षण
१९) मूल्यशिक्षण३९) शिक्षक शिक्षण
२० मुक्त व दूर शिक्षण४०) लोकसंख्या व पर्यावरण शिक्षण

शिक्षणक्षेत्रात संशोधन करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था : श्री. रा. वि. परूळेकर यांच्या प्रयत्नाने ‘इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या नावाची एक संस्था १९४८ मध्ये मुंबई येथे स्थापन झाली होती. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ या संस्थेची स्थापना १ सप्टेंबर १९६१ रोजी झाली. ही एक स्वायत्त संस्था असून तिच्या मार्फत देशातील शालेय शिक्षणातील सर्व समस्यांबाबत अभ्यास केला जातो. केंद्र शासनाचे शिक्षण आणि समाजकल्याण खाते या संस्थेला अर्थसाहाय्य करते. शालेय शिक्षणासंदर्भात शिक्षण व समाजकल्याण खात्याची प्रमुख साल्लगार म्हणून ही संस्था काम करते. त्याचप्रमाणे या मंत्रालयाची धोरणे राबविण्याची जबाबदारी तिच्यावर असते. माध्यमिक शाळांतील शिक्षकांकरिता प्रशिक्षण व संशोधन करणे हेही या संस्थेचे काम आहे. या कामांकरिता नऊ विभाग स्थापन केलेले आहेत. शिक्षक-प्रशिक्षणाशी संबंधित सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी ‘नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन’(N. C. T. E.) या संस्थेची स्थापना झाली. संपूर्ण देशात शिक्षक-प्रशिक्षणाचा विकास नियोजनबद्घ व सुसूत्रपणे घडवून आणणे व शिक्षक-प्रशिक्षण क्षेत्रातील नियामके व प्रमाणे यांचे नियंत्रण व अंमलबजावणी करणे, ही या संस्थेची कार्ये आहेत. या दोन संस्थांशिवाय इतर अनेक शासकीय व बिगर शासकीय संस्था शिक्षणक्षेत्रात संशोधन करतात. त्यांपैकी काही संस्था अशा : ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’, ‘विद्यापीठ अनुदान आयोग’, ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन एज्युकेशन बडोदा’, ‘भारतीय शिक्षण संस्था पुणे, सर्व राज्यांमधील ‘स्टेट सेंटर फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’, ‘साउथ इंडियन टीचर्स असोसिएशन’ इत्यादी.

शैक्षणिक संशोधनाचे निकष : सर्वसाधारण संशोधनापेक्षा शैक्षणिक संशोधनाचे स्वरूप वेगळे असून त्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत :

 • शिक्षणविषयक निश्चित तत्त्वज्ञान हा शैक्षणिक संशोधनाचा पाया असतो.
 • शैक्षणिक संशोधकाला कल्पकतापूर्ण अंतर्दृष्टी असते.
 • शैक्षणिक संशोधन हा विविध विषयांचा समन्वय असतो.
 • शैक्षणिक संशोधन हे केवळ तांत्रिक प्रक्रिया नव्हे.
 • शैक्षणिक संशोधनपद्धतीत संख्यात्मक भाग कमी व गुणात्मक भाग अधिक असतो.
 • शैक्षणिक संशोधन हे कमी खर्चिक असते.
 • शैक्षणिक संशोधनामध्ये कारण आणि परिणाम एकमेकांवर अवलंबून असतात.
 • शैक्षणिक संशोधनामध्ये व्यक्तीनिष्ठतेचे प्रमाण अधिक असते.
 • अधिक चांगली शिक्षण प्रक्रिया हेच शैक्षणिक संशोधनाचे मुलभूत उद्दिष्ट होय.

आज समाजात वैविध्यपूर्ण परिवर्तन घडून येत आहे. परिवर्तीत समाजाला अनुकूल शिक्षण देण्यात शैक्षणिक संशोधनाचा मोठा वाटा आहे. शैक्षणिक संशोधनाचा फायदा केवळ संशोधकांपुरताच मर्यादित नसून तो शिक्षणप्रक्रिया आणि राष्ट्रउभारणीकरिताही महत्त्वपूर्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *