समावेशक शिक्षण (Inclusive Education)

भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात. हे शिक्षण ‘समान संधी’ तत्त्वावर आधारलेले असून या शिक्षणपद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो.

इतिहास : १९६० मध्ये ‘सर्वांसाठी शिक्षणʼ (Education for all) ही संकल्पना जगातील अनेक देशांत अस्तित्वात आली होती. या संकल्पनेस हळुहळु चालना मिळून तिचा १९८१ च्या काळात प्रसार होऊ लागला. १९९० मध्ये सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेतून ‘समावेशक शिक्षणʼ या संकल्पनेचा उदय झाला. १९९४ मध्ये भारतासह एकूण ९२ देशांनी आणि २५ शैक्षणिक संघंटनांनी संकल्पनेस मान्यता दिली व स्वीकारली आहे. १९९९ मध्ये युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization : UNESCO) या संस्थेने नियमित शाळेतील भिन्न मुलांच्या गरजांनुसार सर्वांसाठी अध्यापन कार्यनीती विकसीत करावी, असे सुचविले. युनेस्कोच्या मते, ‘वंचित बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजांचा शोध घेत लक्ष केंद्रित करणारा विकासात्मक उपागम म्हणजे समावेशक शिक्षणʼ.

समावेशक शिक्षण या व्यवस्थेत ‘विशेष खोली योजनाʼ आणि ‘फिरता शिक्षक योजनाʼ (Mobile Teacher) अपेक्षित असतात. विशेष खोली योजनेनुसार बालकांच्या विशेष गरजांप्रमाणे खास शिक्षण साहित्य विशेष खोलीत उपलब्ध असते. फिरता शिक्षक योजनेत नियुक्त फिरत्या शिक्षकाने अनेक समावेशक शाळांना भेटी देऊन साधने व उपकरणे यांची ने-आण करणे, वेळापत्रक आखणी करणे, विशेष गरजांनुसार नियमित शिक्षकांशी व शाळेच्या प्रमुखांशी विचार विनिमय करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे इत्यादी अपेक्षित असते. सर्व तऱ्हेच्या मुलांना भेदभावरहित शिक्षणाची समान संधी, सर्वांना दर्जेदार शिक्षण या तत्त्वांवर समावेशक शिक्षण चालते. १९९४ मध्ये समावेशक शिक्षणास विधीवत मान्यता, कार्यक्रम मुल्यमापन, विशेष मुलांच्या पालकांची संघटना, अशा किशोरांचे व्यावसायिक प्रशिक्षण, संशोधन व विकास इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांनुसार समावेशक शिक्षणाची कार्यवाही व्हावी, असे ठरले.

वैशिष्ट्ये : समावेशक शिक्षणाची पुढील वैशिष्ट्ये ही समावेशक शिक्षकास आपली अध्यापननीती ठरविण्यास मदत करतात :

 • सामूहिक कृतींमुळे विद्यार्थ्यास सहकार्यात्मक अध्ययन प्रभावी वाटते. गटबांधणी, नेतृत्व विकास सहभाग, आंतरक्रिया इत्यादी सामाजिक कौशल्ये सहकार्यात्मक अध्ययनामुळे विकसीत होऊन समावेशक शिक्षणाचे बलस्थान ठरते. परस्पर सहकार्याने शैक्षणिक विकासात मदत करणे, सार्वांची प्रगती होणे हेच गटाचे यश या कार्यनीतीच्या वैशिष्ट्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्यांच्या अंगवळणी ती कशी पडतील, हे शिक्षकाने पाहावे.
 • वर्गशिक्षकाने सर्वप्रकारच्या मुलांना विषय ज्ञान देताना त्यांच्यामध्ये अध्यापन कुशलतेची आवश्यकता असते. तो अध्यापन करीत असताना दुसऱ्या शिक्षकांकडून जरूर तेव्हा त्यास आधार देऊन अध्यापनातील उणीव भरून काढली जाते. अशा वेळी उभय शिक्षकांमधील संबंध लवचिक आणि संपर्क प्रभावी असणे आवश्यक आहे.
 • आपल्या वर्गातील वा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्याने शिकविल्यास त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्रतिष्ठा, आत्मविश्वास बळावेल आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये विषय समज वाढेल.
 • उच्चार, भाषा, शरीर, व्यवसाय यांसंबंधित त्रुटी विशेष मुले व सामान्य मुले यांच्यातून दूर होण्यासाठी संबंधित उपचारतज्ज्ञ गरजनिहाय उपचार करतात.
 • दोन्ही तऱ्हेच्या मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, सामाजिक इत्यादी गरजा लक्षात घेऊन अभ्याक्रमात वेळो वेळी सुधारणा केल्या जातात.
 • ज्या शाळांकडे सर्व प्रकारच्या अध्ययनाच्या सुविधा असतात, त्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश देऊन शिक्षक व शिक्षणसंस्था त्यांचे स्वागत करतात.
 • वर्गामध्ये जास्त विद्यार्थी असले, तरी शिक्षक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करतात व त्यांची प्रगती करतात.
 • सर्व मुलांना सामाजिक कार्याची माहिती दिली जाते.
 • मुलांच्या शैक्षणिक व इतर समस्या सोडविण्याकरिता सर्व शिक्षक विचारविनिमय करतात.
 • गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहात नाही.

अमेरिका व न्युझिलंड या देशांमध्ये समावेशक कार्यक्रम यशस्वी झाला आहे. १९९७ मध्ये ६ ते १४ या वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून त्यांचा क्षमताविकास साधण्यासाठी दर्जेदार व व्यवहारोपयोगी शिक्षण एकत्र देण्याचे ठरले. अंती त्यालाच समावेशक शिक्षणाचे रूप लाभले.

फायदे : समावेशक शिक्षण हे महत्त्वाची शिक्षणपद्धती असून तिचे फायदे पुढील :

 • सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले यांचा एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे वातावरणात ते एकमेकांना मदत करायला शिकतात; एकमेकांपासून ते संवाद व आंतरक्रियात्मक कौशल्ये शिकतात; आंतरक्रियांपासून ते मैत्री, आपुलकी, परस्परसंबंध, वर्ग सभासद म्हणजे काय इत्यादी शिकतात. उभय प्रकारची मुले परस्परांशी सकारात्मक वागतात. परिणामी भावी नागरीक म्हणून सामान्य मुलांना विशेष गरजा असलेल्या नागरीकांची कसे वागावे, हे उमजते.
 • सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले एकत्र शिकल्याने सरकारचा शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी होण्यास मदत होतो.
 • समावेशक शिक्षणामुळे ७५ टक्के अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश मिळाल्याने विशेष शाळेच्या मर्यादित वातावरणापेक्षा सर्वांबरोबर शिक्षणाची संधी मिळेल. तसेच प्रार्थना, कला, क्रिडा, मधल्या सुट्टीत डबा खाणे, स्पर्धा इत्यादींबाबत विशेष मुलांना वर्गातील सामान्य मुलांशी समायोजन कसे करायचे हे समजते. कठपुतळी, चित्रपट, व्याख्यान, आदर्श वाचन, आदर्श वर्तन यांसारख्या कार्यक्रमांतून उभय मुलांच्या जाणीवा रुंदावल्यामुळे त्यांच्यामध्ये अपेक्षित जाणीव निर्माण होते.

मर्यादा :

 • वर्गात विशेष व सामान्य अशी दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यामुळे शिक्षक दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून ज्या पद्धतीने व गतीने वर्गात अध्यापन करतो, ते अध्यापन सामान्य मुलांच्या दृष्टीने संथ असते. परिणामी सामान्य विद्यार्थी कंटाळण्याची शक्यता असते.
 • विशेष मुलांच्या गरजांकडे अपेक्षित विशेष लक्ष देण्यास शिक्षकास सवड मिळत नाही.

सर्वसामान्य शाळा आणि समावेशक शाळा यांतील फरक

सर्वसामान्य शाळासमावेशक शाळा
सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश व शिक्षण दिले जाते.सर्वसामान्य विद्यार्थ्यी व विशेष विद्यार्थ्यी या दोघानांही शाळेत प्रवेश व समान शिक्षण दिले जाते.
शिक्षणाचा आराखडा व पद्धती पूर्वनियोजित असते.शिक्षणपद्धतीत लवचिकता असते.
सामुदायिक प्रकारची अध्यापनपद्धती असते.वैयक्तिक प्रकारची अध्यापनपद्धती असते.
अध्यापनपद्धती विषयकेंद्रित असते.अध्यापनपद्धती बालकेंद्रित असते.
केवळ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कौशल्य असलेले शिक्षक असतात.सर्वसामान्य विद्यार्थी व विशेष शैक्षणिक गरज असणारे विद्यार्थी या दोघांनाही शिकविण्याचे कौशल्य असलेले शिक्षक असतात.
सर्वसामान्य मुलांचा विचार करून भौतिक सुविधा उपलब्ध असतात.सर्वसामान्य मुले व विशेष मुले या दोघांचाही विचार करून भौतिक सुविधा उपलब्ध असतात. त्यात वेळो वेळी वाढ व बदल केली जाते.
सर्वसामान्य शाळेतील शैक्षणिक वातावरण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अनुकूल असेलच असे नाही.समावेशक शाळेतील शैक्षणिक वातावरण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अनुकूल असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *