प्रौढ विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्वत:च्या बऱ्यावाईट कृती समजून घेण्यास आणि परिणामक रीत्या सुखी जीवन व्यतीत करण्यास साह्यभूत ठरणारी एक संकल्पना. समुपदेशन या संज्ञेत मार्गदर्शन आणि समुपदेशन या दोन समानार्थी संज्ञा अध्याहृत असून त्या प्रसंगानुसार वापरल्या जातात. मार्गदर्शन या संज्ञेत सल्ला हा महत्त्वाचा असतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. समुपदेशन हे निर्णयप्रक्रियेत परिस्थित्यनुसार कोणती गोष्ट योग्य-अयोग्य याचे शिक्षण (ज्ञान) देते. ही कृती अधिकतर व्यक्ती सापेक्ष असते. ही वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी आधुनिक संकल्पना आहे. तिला ‘सहमंत्रणाʼ असेही म्हटले जाते.
समुपदेशन हा मार्गदर्शनप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असून ती एक मुक्त प्रक्रिया आहे. समस्या निराकरणार्थ प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक मदतीने स्वत:च्या एक वा अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करते व ती समस्या सोडविण्यास प्रारंभ करते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स आर. (Carl Rogers R.) यांच्या मते, ‘समुपदेशन ही दोन व्यक्तींतील प्रत्यक्ष भेटींची मालिका असते. यामध्ये ग्राहकास स्वत:शी वा त्याच्या भोवतालच्या परीस्थितीशी परिणामकारक समायोजन करण्यास मदत केली जाते.’ समुपदेश्यांमध्ये (विद्यार्थ्यांत) स्वत:ची समस्या स्वत: सोडविण्याची कुवत निर्माण व्हावी, हा समुपदेशनाचा उद्देश असतो.
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल, संगणक, इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनांद्वारा नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. त्यामुळे त्यांच्यावर ज्या वयात योग्य संस्कार रुजायला पाहिजेत, तसे न होता ते बाह्य प्रलोभनांना बळी पडतात आणि कधीकधी गैर मार्गाकडे आकृष्ट होतात. सततच्या परीक्षा, खासगी वर्ग, खेळण्यावर मर्यादा, मित्र-मैत्रिणींत होणारी तुलना, पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्यांचे निवारण होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजेच समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते. अन्यथा अशा परिस्थितीत विद्यार्थी निराश होण्याची शक्यता असते. हे काम समुपदेशक करतात. तसेच शिक्षकही समुपदेशकाची भूमिका बजावीत असतात. त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास असल्यामुळे त्याचा चांगला सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येते.
प्रसिद्ध इंग्लिश मानवशास्त्रज्ञ सर एडवर्ड बर्नेट टायलर (Sir Edward Burnett Tylor) यांच्या मते, ‘स्वत:चे व्यक्तिमत्त्व व स्वत:मधील गुणांचा उपयोग प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी कसा करता येईल, याचा शोध घेण्यासाठी व्यक्तीस मदत करणे, हे समुपदेशकाचे काम होय.’ समुपदेशकाचे मार्गदर्शन हे संशोधनपर शास्त्रीय विश्लेषणावर आधारित असते. समुपदेशन हे विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वाच्या कृतींत उपयुक्त ठरते. सामान्यपणे विचार करता समुपदेशन हे व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या प्रवृत्तिदर्शक, परिस्थितिजन्य, कायदेविषयक, संस्थाविषयक इत्यादी प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत करते. समस्या सोडविण्यास साह्य करणे, हा समुपदेशनाचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे समुपदेशक प्रशिक्षित, अभ्यासू, तज्ज्ञ व अनुभवी असावा लागतो. मार्गदर्शन व सहकार्य करण्याची आवड, आत्मविश्वास, सहनशीलता इत्यादी गुणांमुळे समुपदेशकाचे व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. समुपदेशक नेहमी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व सामाजिक समायोजन या दोन गोष्टी यशस्वी होण्यासाठीचा मार्ग शोधत असतो. तो शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देतो आणि यशस्वी रीत्या अभ्यास पूर्ण करण्यास मदत करतो. तसेच त्यांना बदलत्या परिस्थितीत मदत करतो. समुपदेशन करीत असताना समुपदेशक विविध संस्था, सरकारी यंत्रणा इत्यादींचे सहकार्य घेत असतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शाळा व घर या दोहोंमधील मध्यस्थ म्हणून समुपदेशक काम करीत असतो.
शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात अनंत समस्यांनी ग्रस्त असलेला विद्यार्थी (व्यक्ती) म्हणजे समुपदेश्य होय. समुपदेशक व समुपदेश्य यांच्यात विशिष्ट नाते निर्माण होणे आवश्यक असते. तसेच उभयतांत विश्वास व परस्परसंबंधांत भावनिक आपुलकी असली पाहिजे. तसेच एकमेकांत कोणत्याही गोष्टीबाबत पारदर्शकता असली पाहिजे. समस्या जरी समुपदेश्याची असली, तरी दोघांनी एकत्रित विचारविनिमय करून तिचे निरसन करण्यासाठी योग्य मार्ग निवडला पाहिजे. हे संघटित क्षेत्र आहे. तिथे अनेक प्रकारच्या मार्गदर्शक सेवा उपलब्ध असतात. त्या वैयक्तिक जीवनात जशा मार्गदर्शक ठरतात, तशाच त्या शैक्षणिक व व्यावसायिक या क्षेत्रांतील प्रश्नांच्या बाबतीतही उपयुक्त ठरतात.
समुपदेशनाचे प्रकार : समुपदेशक हा समुपदेशनप्रक्रियेत कोणत्या दृष्टिकोणातून भाग घेतो त्यानुसार समुपदेशनाचे पुढील प्रकार पडतात :
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply