एक मुलगी होती साधी सरळ थोडीशी खट्याळ. नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली आणि एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला. अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्यांची छान मैत्री झाली. त्यातूनच त्यांचे फोन call आणि sms चालू झाले. ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची. जर तिने एखाद्या दिवशी call किंवा sms केला नाही तर तो तिच्यावर रागवायचा आणि तिला विचारायचा “काल तू फोन का नाही केलास, मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची “. मग ती त्याला म्हणायची की, ” नाही sorry काल नाही जमलं फोन करायला ” तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा.
रोज त्यांचे फोन आणि sms चालू असायचे. त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे. तिने किती ही ठरवलं की आपण त्याला जास्त sms नाही करायचं.. तरी ही त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे. ती त्याला sms करायची. त्यांचे एकमेकांशी सवांद वाढू लागले होते. ती एकटी असली की त्याच्या विचारात गुंतायची. किती ही ठरवलं की नाही त्याचा विचार करायचा, तरीही ती अधिका-अधिक त्याच्यात गुंतत जात होती. कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याच्या विचारात असताना त्याला आठवून गालातल्या गालात हसायची. गाणं गुणगुणायची.
” पाहिले न मी तुला,
तू मला न पाहिले,
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले “
आता तिला त्याची सवय झाली होती. तिला सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं. हळू हळू ती त्याच सगळं काही ओळखू लागली होती.
“त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?” ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा…
“अगं तुला कसं कळलं कि माझा मूड खराब आहे ते…?.”
ती त्याला म्हणायची
“मैत्री केली आहे थोडं फार तरी कळू शकतं “..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली. त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे.. तिला त्याच्याबद्दल सगळं माहित होतं.
तो कसा आहे..?
त्याचा स्वभाव कसा आहे..?
त्याचं दिनक्रमच तिला माहित झाल होता..
तो कधी जेवतो….
घरी किती वेळ असतो…
मित्रांबरोबर किती वेळ असतो…
कधी झोपतो कधी उठतो..
तिला ही वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करत आहे. पण तसं काही नव्हते, असचं एकदा तिने त्याला फोन केला. दोघांच्या पण गप्पा छान रंगल्या होत्या, आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं…. पण काही केल्या तिला ते जमत नव्हते. मग त्यानेच तिला विचारले ” तू लग्न कधी करतेस ?”.त्यावर ती चटकन त्याला म्हणाली…” छे ! एवढ्या लवकर नाही अजून वेळ आहे बघू , “तू कधी करतोस लग्न”… तेव्हा तो तिला म्हणाला ” मी लग्न करणार नाही. मी एकटाच बरा आहे..”. मग त्याच्या या उत्तरावर ती खूप दुखी होते. काही क्षण तिला काहीच सुचत नाही. हा असा का बोलत आहे. पण स्वतःला सावरून ती परत त्याला विचारते. ” तू असा का बोलत आहे. तुझ्या आयुष्यात काही घडलं आहे का?” तो अपसेट होऊन तिला म्हणतो ” होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच बरा आहे खूप सुखी आहे”. त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं आहे हे कळल्यावर ती विषय बदलते आणि ते दोघे दुसऱ्या विषयावर बोलू लागतात आणि ती त्याचा कोमजलेला चेहरा परत फुलवते..
” सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला! रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?” तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत असे. तो नकळत तिला बोलून जातो. “तू खूप चांगली आहेस… तुझ चांगलच होईल…” पण ती मनातल्या मनात म्हणत असे, “माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील” कारण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती. त्याला कळलं नव्हतं की ती निष्पाप त्याच्यावर प्रेम करायची. तिच्या मनात एक आशा होती कधी तरी तो तिचा विचार करेल. कधी तरी त्याला तिच्या भावना समजतील. तिला नेहमी वाटायचं आज न उद्या त्याला माझं प्रेम कळेल आणि मी माझं प्रेम व्यक्त करेल. असेच २-३ वर्ष निघून जातात. ती अजूनही त्याला तशीच call – sms करत होती. ती त्याची वाट पाहत होती, तिच्या मनात कुठेतरी आशा होती. की तो पण तिच्यावर प्रेम करेल. गणेशोत्सव चालू होते. ७ दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावी निघाले होते. ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती. तिच्या मोबाईलवर सारखे call येत होते. समुद्रावर पोहचल्यावर परत तिला एक call आला तिने तो call receive केला आणि ऐकलं,
“असलं कसलं तुझं आंधळ प्रेम तू फसलीस तुला फसवलं ”
ती पुर्णपणे घाबरली होती “का काय झालं ?”
“अगं तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो married आहे….” हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते. एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतते पायातून रक्त वाहते आणि हे तिला माहितच पडल नाही. ती तशीच स्तब्ध होती. तेवढ्यात तिचे मित्र आणि आई शोधत येतात. तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते “अगं पायात काच गेली आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे” आई मग पायातून काच काढते. पण तिचं हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत तशीच जाऊन ती समुद्राच्या काठी बसते कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती त्याला call करते डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते.
“ह्या पुढे मला कोणत्या ही प्रकारचा contact करू नकोस”
तो खूप गोंधळून गेला होता ही अचानक अशी काय बोलते म्हणून
“अगं काय झालं ”
ती ” तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस”
त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला बोलते ” तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते”
तो म्हणतो ” हो मला माहित आहे ”
ती shock होते “काय”
तो ” हो मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी ही तुझ्यावर प्रेम करतो.. पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त ही. मला तुला फसवायचं नव्हतं आणि मला तसं करता नाही आलं असतं. म्हणून मी तुला काही बोललो नाही. मी पण तुझ्यावर खरं प्रेम केलं मला ही तुला बोलायचं होतं पण मी घाबरत होतो की कदाचित हे सगळं समजल्या नंतर तू माझी मैत्री ही तोडशील म्हणून मी तुला काही बोलत नव्हतो. मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती. मी तुला कधी मिळवू शकत नव्हतो. पण मला तुला गमवायचं पण नव्हतं. म्हणून मी गप्प होतो. नशीब पण कसे आहे बघ ना जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हतं आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो तुझा पुढचा जन्म फक्त माझ्यासाठी असू दे” आणि तो शांत होतो. तिला हसावे कि रडावे तेच कळतं नव्हते शेवटी ती त्याला बोलते.” आज मी हारून पण जिंकली आहे “आणि call ठेवते आजही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात फरक एवढाच की ते प्रेम फक्त त्यांच्या स्वतः पुरत असतं. तिने आता त्याला call – sms करणे सोडले आहे. पण तो महिन्यातून – पंधरादिवसातून १-२ call करून तिची विचारपूस करतो…