आठवणीत तुझ्या…

रस्ता क्रॉस करायचा होता…. जोशी काका, त्यांचा मुलगा आणि त्यांची सुन रस्त्याने चालले होते. रस्ता तसा नेहमीचाचं पण गाड्या भरधाव अशा सुसाट धावायच्या की सिग्नल लागला नसेल तर रस्ता क्रॉस करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे लक्षण होते. जयेश ने आरतीचा हात धरला अन “बाबा चला लवकर, सिग्नल लागला” असे ओरडून ते दोघे धावले. पार रस्ता ओलांडून दुसऱ्या रस्त्याला चालू सुद्धा लागले, आरतीने मागे वळून बघितले अन तिने जयेशला मागे खेचले, “अरे थांब, बाबा तिथेच आहेत. साठीकडे झुकलेल्या जोशी काकांसाठी हा रस्ता नवीन नव्हता. सहा महिन्यांपूर्वी ते गावी रहायला गेले होते परंतु त्यांचे अवघे तारुण्य या मुंबईत गेले होते…

आता वार्ध्यक्याचे (खरे तर निवृत्तीनंतरचे) आयुष्य त्यांना त्यांच्या पत्नीसोबत घालवायचे होते, तिला तिच्या हक्काचा वेळ द्यायचा होता या विचाराने ते दोघे म्हणजे जोशी काका आणि जोशी काकू गावी शिफ्ट झाले होते.. परंतु म्हणून काही या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते रस्ता क्रॉस करणे विसरले होते?… कसं शक्य आहे? जयेश विचार करत होता, आणि त्याने पुन्हा रस्ता क्रॉस केला आणि बाबांना घेऊन आला..

रात्री नेहमीप्रमाणे जेवणे उरकली. आरती ने आरुषला झोपवले आणि जयेशकडे वळली, “आरुष झोपलाय, जाऊया आता तरी, बोलूया का बाबांशी?” “अगं रात्रीचे अकरा वाजले आहेत, झोपतील ते आता, उद्या बोलू” “नाही जयेश, जागे आहेत ते. तुझा उद्या कधीच उजाडणार नाही, प्लीज आज काय ते नक्की करायलाच हवं” शेवटी नाखुशीने तो तयार झाला. जोशी काका ग्यालरीमध्ये आरामखुर्चीत बसले होते… आकाशातील ताऱ्यांकडे बघत.. नकळत काहीतरी बोलत होते.

जणू काही त्या ताऱ्यामध्ये कोणीतरी असल्यासारखे. जयेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते तंद्रीतून जागे झाले, “अरे बाळांनो तुम्ही जागे आहात.. झोपा जा… ऑफिस नाही का उद्या… आरु झोपला वाटते..?” नकळत त्यांनी एका हाताने डोळे टिपले, दोघांच्या नजरेतून ते काही सुटले नाही. “उद्या शनिवार आहे सुट्टी आहे आमची, म्हणूनच मुद्दाम आज तुमच्याजवळ आलो आहे… काय गप्पा मारता त्या ताऱ्याशी… ?… ते एवढे लांब… मिलो दूर, त्यांच्याशी रात्रभर बोलता. आज आमच्याशी बोला ना काय बोलत असता त्यांच्याशी?” आरती भडाभडा सगळं बोलून गेली…

जोशी काका वेळ न दवडता बोलले, “आज वेळ आहे ना तुमच्याकडे, आज तुमच्याशी बोलतो आणि आरती, मी न ह्या ताऱ्याशी नाही गं बोलत, मी ‘हिच्याशी’ बोलत असतो…. तिला या ताऱ्यामध्ये पाहत असतो…” हे दोघे थोडे घाबरले, बाबांची मानसिक अवस्था ठीक तर आहे ना ? असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटला, वडिलांनी ते ओळखले आणि बोलले, “घाबरू नका, तुम्हाला एक लव स्टोरी ऐकवू का?” “बाबा?” हे दोघे आश्चर्याने एकदमच बोलले…. पुढे जोशी काका आठवणीत रमले आणि बोलत गेले आणि हे दोघे ऐकत गेले….

“तुमची आजची पिढी हि प्रेमविवाहाला जास्त मानणारी… वयात आलो नाही तर तुम्हाला गर्ल फ्रेंड नाहीतर बॉय फ्रेंड हवा असतो… काय एवढं वेगळ बोलायचं असतं तुम्हाला जे तुम्ही आई वडिलांशी शेअर नाही करू शकतं? बरं ते जाऊदे … सख्खी भावंड तरी आहेत ना तुमच्याच वयाची…? मग जनरेशन ग्याप चा प्रश्न येतो कुठे? बरं जाऊदे मला तुम्हाला फैलावर नाही घ्यायचं रे… फ़क़्त थोडंस वेगळं प्रेम जे मी अनुभवलं त्याची प्रस्तावना किंवा कल्पना तुम्हाला यावी… म्हणून बोललो…” या दोघांनी सुटकेचा श्वास सोडला..

“एक वेगळीच गम्मत असते रे लग्न करून त्या बंधनात अडकून मग आयुष्याच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करण्यात, त्याच्याशी जुळवून घेण्यात…. तुझ्या आई बरोबरचा माझा संसार ३५ वर्षांचा.. खूप गोष्टी अनुभवल्या आम्ही एकत्र.. सुख, दुःख… कितीतरी ऋतू कसे बदलून गेले…. आता सगळंच संपल्यासारखं वाटतंय रे… तिची आणि माझी पहिली भेट… तुझ्या मावशी आजीने सुचवलेलं स्थळ.. तिच्या घरी गेलो, मी पाहिलेलं हे तिसरं स्थळ असेल बहुतेक… यावेळेस पहिले पत्रिका जुळवली आणि मग भेटीचा कार्यक्रम आखला होता… खरं तर कांद्यापोह्यांचा अन चहाचा. ठरवून लग्न करण्यात हा मात्र एक तोटा असतो बरं का… म्हणजे मुलींसाठी लग्न जुळलं तर ठीक नाही तर उगाचच खर्च आणि मुलांसाठी सुद्धा… अरे मुलीच्या घरी जाण्या-येण्याचे भाडे नाही का प्रवासाचे?” हा हा हा जोशी काका अचानक हसायला लागले ..

पुन्हा सुरुवात “तिच्या घरी पोहोचलो साधारण ५.३० वाजता संध्याकाळी. पावसाळ्याचे दिवस होते.. त्यामुळे गरमागरम पोह्यांची अपेक्षा होती.. आपले काही नियम कळतंच नाहीत, म्हणजे नुसते पोहे खाऊन पूर्ण स्वयंपाक करता येतो कि नाही हे कसे ठरवायचे बरे? आणि खरंच ती मुलगी (उपवर वधू) बनवत असेल का ते पोहे? पण यावेळचे पोहे चांगले निघावेत अशी खूप अपेक्षा होती, तुझ्या आईचा फोटो खूपच आवडला होता रे.. अपेक्षेप्रमाणे आणि फोटोपेक्षा खूप जास्त सुंदर दिसत होती ती प्रत्यक्षात, ती मोरपंखी रंगाची साडी, त्याचा तो जाडा काठ, तिची लाजेने खाली झुकलेली नजर, कपाळावरची टिकली, लांब सडक केस आणि त्यात घातलेला तो मोगऱ्याचा गजरा… काय सुंदर दिसत होती ती..” आरती खुदकन हसली.. “बाबा इज ब्लशिंग…” जयेशलाही गम्मत वाटली.

काका बोलत होते, “तिने बश्या ठेवल्या पण त्यात पोहे नव्हते… गोड शिरा होता अन त्याबरोबर चहा नाही काही तर कॉफी होती. हे मात्र नवीन होतं. असं का? याचा खुलासा पुढे होणाऱ्या प्रश्नोत्तरात तिला करणारच हा निर्धार, मी केला होता. एकमेकांची तोंड ओळख होण्याइतके विरुद्ध पार्टीनी (आम्हा दोघांचे आई वडील आणि इतर उपस्थिथ मोठे मान्यवर ) एकमेकांना प्रश्न विचारून झाले होते.

त्यांची मनासारखी उत्तर देऊन तोंडी परीक्षेत आम्ही पास झालो होतो हे त्यांच्या चेहऱ्यावळून कळालं होतं. त्यात माझे मामा बोलले “मग त्यांना बोलुदे थोड सविस्तरपणे, आपण जाऊया आतल्या खोलीत.” देवा केव्हापासून हे ऐकायचं होत मला… त्या अधिरेपणाची, घाईची मजाच वेगळी… आता आम्ही दोघेच होतो, एकटे.. तिची नजर खाली आणि माझी तिच्या चेहऱ्यावर… पहिले विचारलं, “हा शिरा कॉफी काय प्रकार आहे? कांद्यापोह्यांचा कार्यक्रम असतो ना?” तिला हा प्रश्न अपेक्षित होता बहुतेक. ती म्हणाली, “माफ करा, थोड स्पष्टच बोलते.. आमच्या घरच्यांनी तुमची माहिती काढली होती, त्यांना तुम्ही आधीच आवडला होतात.. त्यामुळे मी हि होकारच दिला होता. तुम्ही माझ्या भावी आयुष्याचे जोडीदार व्हावे असं वाटत होतं आणि म्हणूनचं आपल्या नात्याची सुरुवात तिखट अशा कांद्यापोह्यानी न होता गोड शिऱ्याने व्हावी.. म्हणून शिरा आणि नात्यात फ़क़्त गोडपणाच राहतो अस शक्यच नाही म्हणून सोबतीला कॉफी थोडीशी कडवट.. पुढच्या प्रवासात सुख आणि दुःख येणारच ते तर आयुष्य आहे.. ते आपण दोघे एकत्र मिळून सांभाळून नेऊ आणि लग्नाच्या व संसाराच्या वादळ वाटेला सामोर जाऊ हेच सांगायचं होतं…” तिचं मराठी भाषेवरच प्रभुत्व अफाट होतं पण त्याबरोबरच तिची भावनिकता जुडली होती आणि खंभीरपणे आलेल्या संकटाला एकजुटीने सामोर जायची तयारीही… त्या तेवढ्याशा ५-६ ओळीनी तिने माझं हृदय जिंकून घेतलं. तिच्यावरच्या संस्कारांची जाणीव झाली आणि आमच्या लग्नाची सुपारी फोडूनच आम्ही परतलो. कुमारी भैरवी विष्णू बर्वे, सौभाग्यवती भैरवी उमाकांत जोशी झाली. आमच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले आणि ती माझ्या आयुष्यात कायमची आली.

एक नोकरी सोडली तर माझ्याकडे स्वतःच असं म्हणवून घेण्यासारखं काहीच नव्हत. वडिलोपार्जित दोन खोल्यांचं चाळीतलं घर. मी मोठा माझ्या मागे दोन बहिणी, एक भाऊ तो तसा लहानच होता. म्हातारे आई वडील. हिच्या घरची परिस्थिती तशी म्हणायला गेलं तर माझ्यापेक्षा उत्तमच. पण पाण्यात साखर विरघळावी तशी हि आमच्या घरात नांदू लागली. आमच्यातलीच एक बनून. सगळ्यांनाच आपलंस केलं तिने.

लग्नानंतर म्हणावा तसा एकांत आम्हाला कधी मिळालाच नाही. गप्पा गोष्टी- गुजगोष्टी असं बोलणं हिला नेहमीच खटकायचं.. “अहो… असं काय … आई अण्णा काय म्हणतील…?” या प्रश्नावरचं आमची गाडी अडकायची. त्यातूनही मी काहीना काही मार्ग काढायचोच. माझ्या ऑफिसची वेळ तशी ठरलेलीच, तरीही कधी कधी लवकर सटकायची संधी मिळायची, १ वा २ तास. त्याकाळी मोबाईलची सुविधा नव्हती, मोबाईल काय आमच्या घरी तर साधा MTNL पण नव्हता, मग मी शेजाऱ्यांकडे फोन लावायचो, हिला बोलवायचो ती ही यायची (काहीतरी बहाणा करून) मग आम्ही घरापासून थोड्या दूर असलेल्या बागेत जायचो, गप्पा मारायचो… मज्जा यायची. विवाहित असून देखील असं लपत छपत आमचं प्रेम बहरायचं. “कोणी बघितलं तर काय म्हणेल…?” अशी तिची हुरहूर कायम असायची… पण तिच्या चेहऱ्यावरही आनंद बहरून यायचा, आपल्या हक्काचा नवरा सोबत आहे, त्याचा अभिमान स्पष्ट दिसायचा तिच्या चेहऱ्यावर….

पावसाळ्यात आमचं कौलारू घर गळायचं… बिचारीची खूप दमछाक व्हायची सगळं घर साफ करताना… प्लास्टिक लावलेलं असायचं, तरीही कुठेतरी काहीतरी राहायचचं… मी खूप वैतागायचो “अहो रडायचं कशाला…बाहेर जाऊन आपण भिजू शकत नाही ना… मग इथेच आनंद लुटा ना …” खूपच सकारात्मक दृष्टीकोन असायचा तिचा… टपटप गळणाऱ्या घरात पावसाचा आनंद कसा लुटता येणार..? मग आमची शाब्दिक चकमक व्हायची… पाऊस कशाला येतो? तिथपासून नळाला, शेतीला पाणी कोण देणार? असं कुठल्या कुठे बोलण जायचं… पुढे तुझा जन्म झाला… तिच्या ड्युटीत आणखीन भर पडली… तिचा पगार काही वाढला नाही मात्र मातृत्वाचे प्रमोशन मिळाले हे समाधान तिला आनंद देत होते…

भैरवीच्या जबाबदाऱ्या दिवसेन दिवस वाढत गेल्या… गृहप्रवेश करताच आईने घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे दिल्या… मोठ्या सुनेकडे सारी सूत्रे सोपवली. मी माझी सगळी कामे तिला देऊन टाकली… अंघोळीच्या टॉवेल पासून, रात्रीच्या जेवणापर्यंत… आई होतीच पण घरच्या वाहिनीकडे जास्त लाड व्हायचे म्हणून तुझ्या आत्या आणि छोटे काका तिच्याकडेच धावायचे… केसांना तेलाने मालीश करून घेताना त्यांच्याबरोबर मी हि कधीतरी माझा नंबर लावायचो…

गौरी गणपती, घटस्थापना, दसरा, दिवाळी… सगळे सण सुरळीत पार पडले. दोन्ही बहिणींच्या (माझ्या) लग्नात तिने लगबगीने काम पाहिले… खर्चाचे मोज माप नीट बसत नव्हते.. सोन्याच्या दागिन्यांना तेव्हाही तेवढाच जोम होता जो खिशाला परवडत नव्हता… पहिलीच्या लग्नात तिने स्वतःचा चपला हार मोठ्या मनाने भेट दिला… दुसरीच्या लग्नातही तीच गत… यावेळेस तिने हातातल्या पाटल्या दिल्या.. माझं मन खात होतं, एकीकडे बहिण तर दुसरीकडे बायको… “अगं माफ कर गं मला, आपण नंतर देऊयात ना ? एवढी काय घाई आहे दागिन्यांची, तिच्या सासरकडचे पण मागत नाही आहेत काहीचं….” तेव्हा ती म्हणाली होती, ” माझं लग्न झालं कि तुमच्याशी… मी मिरवले माझ्या लग्नात दागिने घालून आता यांना मिरवू दे कि, नंतर हवे तर मला करा दागिने आणि हो, आईंनी दिलेले तुमचे खानदानी तोडे आहेत कि माझ्या हातात…” तिचा समंजसपणा नेहमीच भारावून टाकायचा…. तिचं मन खूप मोठ्ठ होतं…

आज-कालचे दिवसंच वेगळे… नाती, सण, उत्सव या गोष्टी आनंदाने साजऱ्या करण्यापेक्षा त्यात चढाओढच जास्त वाटते… सगळी कडे बाजारीकरण झालंय… पार्ट्या वाढल्या आहेत… ते प्रेम, नाजूक संवेदनशीलता कुठेतरी हरवली आहे. माझ्या हिचा वाढदिवस…. कामाच्या व्यापात एखाद्या वर्षी विसरलो असेनही तर तिने त्यासाठी घर डोक्यावर घेतलेलं मला कधीच आठवत नाही… तिच्या केसात एखादं गुलाबचं फुल नाहीतर फार फार तर मोगऱ्याचा गजरा घातला कि आमची स्वारी भयंकर खुश… तेच तीच गिफ्ट… तिच्यामुळेच तर पैसा जुळत गेला…

पुढे दिवस बदलत गेले, दिवसांबरोबर परिस्थितीही बदलत गेली.. माझ्या प्रमोशनमुळे पगारात भर पडली.. गाठीला पैसे जोडून जोडून एका घराची दोन घरे केली. आमचा संसार फुलत गेला.. छोट्या भावाचेही लग्न झाले… पण त्याला व त्याच्या पत्नीला एकत्रित कुटुंबात अडकायचे नव्हते, रोज वाद होण्यापेक्षा दुसरे घर आनंदाने तिने दिराच्या नावे करायला लावले.. पैसा, जमीन-जुमला यापेक्षा सतत तिने नात्यांना आणि प्रेमाला जास्त जपले. मात्र नोकरीच्या कचाट्यात सापडलेल्या मला तिला मनसोक्त वेळ देताच आला नाही… माझी भावंडे, आई – वडील मग तू.. तुमचं सगळं करण्यात तिचा वेळ जायचा. आता रिटायरमेंट नंतर तिच्याशी गप्पा मारायचं ठरवलं तर तीच सोडून गेली… मला आयुष्यात शेवटपर्यंत साथ देणार होती ती… आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अशी कशी एकटीच गेली ती…? किती एकटा पडलोय मी? तिला मी नेहमी म्हणायचो, “आपण म्हातारे झालो ना कि मी माझ्या जबाबदारीतून मोकळा होईन, तू हि होशील… मग फ़क़्त आपण दोघे… किती तरी गप्पा मारू, आपला आयुष्याच्या प्रवासावर एकत्रितरीत्या फेरफटका मारून येऊ… मस्त फिरू…” पण काहीच जमलं नाही रे; सारं गणितचं चुकलं. आम्ही गावी शिफ्ट झालो… एका रात्री असेच गप्पा मारत बसलो तर अचानक म्हणाली, “अहो माझ्या छातीत दुखतंय…” आणि बस्स… संपल सगळं, तिने डोळे मिटले… ते कायमचेच… हृदयविकाराचा झटका असा कसा रे…? मला काही बोलूचं दिल नाही… ” जोशी काका हमसाहमशी रडू लागले… आईच्या आठवणीने जयेशचेही डोळे पाणावले. आरतीने दोघांना सावरलं… पण आपली सासू किती चांगली होती, याच्या जाणीवेने तिचाही उर भरून आला. काका थोडे सावरले. पुढे बोलू लागले, “दहा दिवसांपूर्वी देशमुखांच्या घरी गेलो होतो… तुला आठवत असतील देशमुख काका… इथून दोन इमारती सोडूनचं राहायचे, आपल्या घरी यायचे… पण आता तोही नाही” जयेश बोलला, “ते वारले…?” “नाही रे, कुठल्या तरी वृद्धाश्रमात रवानगी केली आहे त्याच्या मुलाने आणि सुनेने…” त्याची बायको होती, नातवंडांना सांभाळायची, त्याला एवढं नाही जमत… सासू गेली, गरज संपली… मुलांसाठी केअर टेकर ठेवली… पण या म्हाताऱ्याला कोण सांभाळणार? तोही खचूनच गेला होता बायको गेल्यावर… चिडचिडा झाला होता… म्हणून धाडल घरापासून दूर त्याला….” “बाबा, पण तुम्हाला हे सगळं कसं माहित?” जयेशने विचारलं, “अरे त्याच्या घरी गेलो होतो, तो नव्हता पण ती केअर टेकर होती ना… तिने सगळं सांगितलं… वरून सल्लाही दिला,”तुम्ही देखील मनाची तयारी करून ठेवा आजोबा…” जरा जास्तच वाईट वाटलं रे.. हि असती तर मी इथे परत आलोच नसतो रे… तू कशाला घेऊन आलास मला?… मी तिथे तिच्या आठवणीत रमलो असतो… आता तुम्हाला उगाचच माझी अडगळ…” त्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्यांची सून एकमेकांकडे बघतचं राहिले… आई बाबांच्या आयुष्याचा प्रवास इथे येऊन नवीन वळण घेईल तेही आपल्या विरुद्ध हे त्यांच्या ध्यानी मनीही नव्हते, तरीही जयेश सावरून म्हणाला, “बाबा काय बोलताय? तुम्ही माझे जन्मदाते आहात, मला एवढचं ओळखलत?” आरती तर रागाने उठून निघून गेली ती गेलेली पाहून जोशी काकांनी मुलाकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले… जणू ते म्हणत होते कि मी ‘तिचा..’ जन्मदाता नाही ना ? थोडा वेळ गेला… रात्रीची शांतता जाणवू लागली…

त्या शांततेचा भंग करत आरती परत आली… जणू काही तिने वडील आणि मुलगा यांच्यामधील मूक संभाषण ऐकलं होतं..काहीतरी दाखवत म्हणाली, “तुम्ही माझे जन्मदाते नाहीत… पण माझ्या मनात तुमच्याबद्दल तेवढाच आदर आहे जेवढा माझ्या सख्या जन्मादात्यासाठी आहे. तुम्हाला मी माझे दुसरे वडील मानते… बाबा…तुम्हीचं आज मला परकं केलंत….” ती देखील रडू लागली.. रडतच पुन्हा म्हणाली,” हे पहा… ह्या घराच्या चाव्या आणि हे तोडे… आई गेल्या पण माझ्या अंगावर सगळ्याची जबाबदारी टाकून गेल्या… मी त्यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही पण तसं प्रामाणिक आणि समंजस वागण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि जगातील सगळीच लोक सारखी नसतात ना? तुम्ही अडगळ कशी होऊ शकता? तुम्ही आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे – पावसाळे पाहिले आहात… तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला हवेच आहेत… आज जसा विचार केलात ना तसा पुन्हा कधी कल्पनेत पण नका करू…” जोशी काका समाधानाने म्हणाले,” चुकलो मी पोरी… खरंच जोशी घराण्याला सुना ह्या फारच गुणवान मिळतात… भाग्यंच हे… आता मी निश्चिंत आहे…” तिघांचे डोळे भरून आले… आणि हसतच,” शुभ रात्री” म्हणत ते झोपायला गेले.

जयेश तर आरतीवर खूप खुश होता त्याला त्याच्या बायकोचा खूप अभिमान वाटत होता. तो म्हणाला, “आरती आज बाबा आईला खूप खुश होऊन सांगत असतील तुझ्याबद्दल… तशीही ती त्यांना स्वप्नात रोज भेटतच असेल.” आरती म्हणाली, “बाबांशी बोललो म्हणून खूप बरं झालं नाहीतर ते नको नको ते विचार करून आजारी पडले असते. मानसिक दृष्ट्या खंगले असते… त्यांच्याशी दररोज थोडं बोलायला हवं… ते एकटे नाहीत याची जाणीव करून द्यायला हवी….”

काही दिवसांनी.. रस्ता क्रॉस करायचा होता. जोशी काकांबरोबर आरती आणि जयेश होते. आरतीने त्यांचा उजवा हात पकडला होता तर जयेशने डावा हात. तिघांनी मिळून रस्ता क्रॉस केला… खरंच मन किती विचार करत असतं… जर आपल्याच माणसांशी थोड मोकळेपणाने बोललो तर नातं कसं सदा प्रफुल्लीत राहतं आणि सतत बहरत आणि फुलत जातं…. हो ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *