करढोक आणि मासे

By | May 20, 2020

करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, ‘तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, ‘अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.’

हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, ‘या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन.

ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.

तात्पर्य

-शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *