मोंटूचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त देशात परदेशात जात असत. मोंटूचा मामाही अमेरिकेत होता. त्यामुळे सतत मोंटूला चॉकलेटचे विविध प्रकार खायला मिळत. चॉकलेट खातांना त्याला मजा येत असे परंतु चूळ भरायला किंवा दात घासायला मोंटूला प्रचंड कंटाळा होता. हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागला. मोंटूचे वजन वाढायला लागले होते. त्याचे दात काळे होऊन किडायला लागले होते. कधी जर खूप थंड किंवा अती गरम पदार्थ खाल्ले तर त्याच्या दातातून कळा येत असत. अश्या वेळी त्याला अत्यंत रडू येत असे. आईबाबा त्याला ह्या गोष्टीवरुन खूप समजावत पण त्याला अजिबात समजावून घ्यायचे नसायचे.
एके दिवशी झोपलेला असतांना त्याला कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले परंतु कोणी दिसेना. थोडयावेळाने आवाज अधिक मोठा झाला. त्याने नीट कानोसा घेतल्यावर लक्षात आले की आवाज तर त्याच्या तोंडातून येत आहे. त्याला अजिबात कळेना म्हणून त्याने आरश्यासमोर आ sss करुन मोठे तोंड उघडले. तर चक्क त्याचे मागचे चार दात म्हणजेच दाढा रडत होत्या. “ऊं, ऊं, मोंटू तू आमची नीट काळजी न घेतल्यामुळे बघ काय झाले?”
“मी..मी कुठे काय केले”, मोंटू ओशाळून म्हणाला.
“हो तूच हे सगळे केलेस. रोज आठ-दहा चॉकलेट्स खायचास. खाल्ल्यावर चूळ भरायचा नाहीस. रात्री दात घासायचा नाहीस. सकाळचे तुझे दात घासणेही घाईचेच असते. त्यामुळे चॉकलेट आणि अन्नाचे सगळे कण आमच्या दातात अडकून रहातात. दिवसरात्र अडकून बसल्यामुळे आम्हाला किड लागली आहे. आमचा पांढराशुभ्र रंग तर काळाकुट्ट झाला आहे. ” दात रडत म्हणाले.
मोंटू दातांचे बोलणे ऐकून अधिकच ओशाळला. दात पुढे म्हणाले “आता तू कुठलाही गरम किंवा गार पदार्थ खाल्ला की आम्हाला किती त्रास होतो माहिती आहे का ? जोरदार ठणका बसतो. डॉक्टर काकांकडे गेल्यावर आता ते आम्हाला काढून टाकणार. तुझ्या हलगर्जीपणामुळे आमचे घर जाणार आहे. ऊं… ऊं… ऊं..”
“मोंटू अरे उठ, शाळेत जायची वेळ झाली आहे” आईची हाक आली.
मोंटू दचकून जागा झाला. “अरे म्हणजे हे फक्त स्वप्न होते तर”. मोंटूला अगदी हुश्श झाले. मात्र त्याने निश्चय केला दातांची काळजी घेण्याचा आणि दात घासायला बाथरुम मध्ये पळाला.