कुत्रा आणि लांडगा

By | May 20, 2020

एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ‘तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही.

याचं कारण तरी काय ? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.’ कुत्रा म्हणाला, ‘अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.’ त्यावर लांडग्याने विचारले, ‘तू काय करतोस ?’ कुत्रा म्हणाला, ‘दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.’ लांडगा म्हणाला, ‘एवढंच ना ? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरं काय पाहिजे ?’ याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असतां कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला.

तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ‘मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?’ कुत्रा म्हणाला, ‘अं हं. ते काही नाही.’ लांडगा म्हणाला, ‘तरी पण काय ते मला कळू देत.’ कुत्रा म्हणाला, ‘अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो, पण दिवस मावळला की तो मला सोडतोच.

मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेनं वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तूही सुखी होशील.’

ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ‘अरे, असा पळतोस काय?’ लांडगा दुरूनच म्हणाला, ‘नको रे बाबा मला ते सुख, ते तुझं तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखं बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणदेखील मला नको !’

तात्पर्य – स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *