गर्वाचे घर खाली

धुक्याच्या जाड पडद्याआड सर्व जंगल लपले होते. झाडांचे आकार, पशुपक्ष्यांची चाहूलही कुठे जाणवत नव्हती. नाही म्हणायला खळखळत जाणारा एक झरा मात्र काहीतरी किलबिलत होता. हळूहळू समोरच्या उंच कडयाआडून सूर्याचे किरण डोकावू लागले. वातावरण ऊबदार झाले तशी धुक्याने काढता पाय घेतला. सादळलेली झाडे उन्हामुळे तजेलदार दिसू लागली. पक्षीही चिवचिवाट करीत आपला आनंद व्यक्त करू लागले.

हळूहळू उन्हे तापली. अन् गारठलेले जंगल पूर्ववत् झाले. झाडे फांद्या हलवत एकमेकांशी गप्पा मारू लागली. इतक्यात वारा तिथे आला. वारा येताच झाडे उल्हसित झाली. आनंदाने डोलू लागली. पण वारा मात्र आज मुळीच खूष नव्हता. बराच वेळ मनधरणी केल्यावर तो म्हणाला, ‘हा डोंगराचा उंच कडा आहे ना तो फार गर्विष्ठ आहे. मला कायम अडवून ठेवतो. सूर्यालासुध्दा लवकर वर येऊ देत नाही.’ ‘हो रे बाबा खरंच!’ झाडांनी मान डोलावली. ‘पण आपण करणार तरी काय?’

‘आपण त्याला सांगायचे जरा ऐसपैस पसर म्हणून माझ्यासारखा?’ , झरा किणकिणला.

मग सर्वांनी त्या उंच कडयाला हाका मारल्या. पण तो आकाशात मान ताठ ठेऊन उभा होता. त्याने नजर वळवूनसुध्दा खाली बघितले नाही. मग वार्‍याने उंच झेप घेतली. त्याच्या कानापाशी जाऊन तो गुणगुणला. ‘तुझ्या अवाढव्य उंचीमुळे सर्व प्राणीमात्रांना फार त्रास होतो आहे, तरी जरा इतरांकडे लक्ष देशील कां?

‘का म्हणून? माझ्या अफाट उंचीचा तुम्हाला त्रास व्हायचं कारण काय? उलट माझ्यामुळे पाऊस पडतो. हे तृषार्त जंगल आबाद रहातं. ह्या सपाटीवरही मी कसा उठून दिसतो. लोक म्हणतात ‘काय उत्तुंग कडा आहे. खरोखर हा जिंकणे कठीण!’ अहो, आजपर्यंत भल्याभल्यांनी हात टेकलेत म्हंटलं माझ्यापुढे!’ आकाशात रोखलेली आपली नजर जराही न हलवता कडा बोलला… त्या गडगडाटाने सर्व प्राणीमात्र भयभीत झाले. वाराही क्षीण होऊन खाली खाली येऊ लागला.

हळूहळू हिवाळयाने काढता पाय घेतला व सूर्याने डोळे वटारले. सर्व आसमंत रणरणत्या उन्हात भाजून निघाला. जंगलाच्या छायेला सर्व प्राणीमात्र धावले. त्याचे हिरवे छत्र सर्वांना सुखदायी ठरले.

इकडे पर्वतही तप्त झाला होता. त्याच्या अंगाची काहिली होत होती. बेडरपणे सूर्यकिरणे अंगावर झेलताना शरीर विदीर्ण होत होते. पण त्याचा ताठरपणा जराही कमी झाला नव्हता.

पुन्हा काही दिवसांनी वार्‍याची सळसळ जाणवू लागली. काळया ढगांनी आकाश भरले. धुंवाधार पाऊस पडू लागला. पर्वताच्या अंगाखांद्यावर ढग बागडू लागले. त्यात तो दिसेनासा झाला.

‘हा पाऊस माझ्यामुळे पडतो. ह्या पिसाट वार्‍याला मी वठणीवर आणतो. हा आसमंत माझ्यामुळे हिरवागार रहातो’, पुन्हा त्याने सर्वांना ओरडून सांगितले. पण विजेच्या गडगडाटात ते कुणाला ऐकू गेले नाही.

डोंगरावर खळखळत वहाणारे निर्झर , दरीत उडया घेणारे धबधबे सर्वजण जंगलाच्या आश्रयाला येत होते. कारण त्यांना जवळ बाळगण्याची माया पर्वताजवळ नव्हती. जंगल मात्र मोठया प्रेमाने सर्वांना सामावून घेत होते. तिथे एक विस्तीर्ण सरोवरच निर्माण झाले होते. डोंगरावरून रोरावत येणारे प्रवाह जंगलाची सीमा ओलांडताच शांतपणे झुळझुळू लागत. त्यांच्यातून गोड नाद निघे. आकाशात घोंगावणारा वारा उंच कडयाला म्हणाला, ‘एवढे ढग तुझ्याभोवती गोळा होतात पण खरा जलसंचय कुणाजवळ आहे तर पायथ्याच्या जंगलाकडे!

तुझ्याजवळ रहायला कुणीच तयार नाही.’

‘त्याची फिकीर मी करीत नाही. कारण ते माझ्या योग्यतेचे नाहीत. म्हणून मीच त्यांना झटकून टाकतो.’ डोंगराने उत्तर दिले.

इकडे आसमंतात लवलवणार्‍या विजांनी त्याचे बोलणे ऐकले व चारी दिशांनी त्याच्यावर झेप घेतली. कानठळया बसवणारा आवाज झाला, लखलखत्या प्रकाशाने डोळे दिपले. प्रचंड गडगडाटाने बेसावध झालेल्या सर्वांनी जेव्हां हळूच डोळे उघडले तेव्हां त्या उंच कडयाचा कुठे मागमूसही नव्हता. दरीच्या खोलीत तो केव्हांच विसावला होता.

डोंगरापलीकडून वहाणारा वारा आज झुळझुळत जंगलात शिरला. कारण त्याला अटकाव करायला कुणीच नव्हते. आकाश आता निरभ्र झाले होते. पिवळीधम्मक सूर्यकिरणे क्षितिजापर्यंत रेंगाळत होती. अन पानापानातून जंगलही सर्वांशी बोलत होते.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *