गाईचा महिमा

भागीरथी नदीच्या तीरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतंभर नावाचा राजा होता. संतानप्राप्तीसाठी जाबाली ऋषींनी त्याला गाईची पूजा करण्यास सांगितले. गाईचे तोंड, शेपूट, शिंगे, पाठ या सर्वांत देवाचे अस्तित्व असून जो गाईचे पूजन करतो, त्याचे मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली मुनींनी राजा जनकाची एक कथा सांगितली.
एकदा योगसामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला.

दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला. त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते. त्या वेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. जनकाच्या शरीरास स्पर्शून येणार्‍या हवेमुळे त्यांना छान वाटले. पण राजा तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्यांच्या यातना सुरू होऊन ते ओरडू लागले. जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले.

त्या दुःखी जिवाच्या करुण हाकांनी जनकाचे मन हेलावले. आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखी होत असतील, तर आपण येथेच राहावे. हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला. धर्मराज यम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला, “आपण तर श्रेष्ठ धर्मात्मा! आपण इथे कसे?

हे पापी लोकांचे स्थान आहे” यावर जनकांनी दुःखी जिवांची दया आल्यामुळे आपण तेथे थांबल्याचे सांगितले. तसेच या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी तेथून जाईन, असेही ते म्हणाले.

पण त्यांचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे, असे यमाने सांगितले. जनकाने तसे करताच सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परमधामास निघाले. मग जनकाने यमधर्मास विचारसे “धार्मिक मनुष्य येथे येत नाही, मग माझे इथे येणे का झाले?” यावर यमाने सांगितले, “आपण पुण्यात्मा आहात, पण आपल्या हातून एक छोटं पाप घडलं.

एकदा एक गाय चरत होती. आपण तिथे जाऊन तिचं चरणं थांबवलंत. पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जिवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे.” हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजा जनक परमधामास गेला. ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतंभर राजाला म्हणाले, “गाय संतुष्ट झाली तर तुला गुणी पुत्र लाभेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *