गोष्ट तिची त्याची आणि पावसाची

By | May 20, 2020

उन्हाळा सरतो आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात, गार वाऱ्यात, पावसाच्या धारात जावं असं त्याला वाटतं. त्याचं हे असं आभाळासारखं भरून आलेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. ती ही त्याच्या सुरात सूर मिसळते, भरून आलेल्या आभाळाखाली पाऊस होऊ पाहते. नंतर मित्र मैत्रिणीं सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस पाहण्याचा बेत ठरतो.

ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला तो आला ती आली आणि ती ही आली पण माझी ती कुठे आहे? तो बेचैन.
काय करावं?

मग तिला फोन करावं सुचलं, तिचं कारण नेहमीचचं. बाबा नको म्हणाले.
तो हिरमुसला.

आता कशाला जायचं पावसात?
ती नाही सोबत, मग कसं चिंब होता येईल आपल्याला रिमझिमणाऱ्या धारात ?
कोणाच्या काळ्याभोर केसातून ओघळणारं पाणी घेणार आपण ओंजळीत ?
आपल्या वाफाळलेल्या चहाच्या कपातला घोट आपण कोणाला देणार ?
आपल्या प्लेट मधली गरम भजी खाताना कोण भांडणार आपल्याशी ?
शी ! जाऊच नये आपण मित्रांसोबत. असे असंख्य विचार त्याच्या मनात येतात. पण सगळ्यांच्या आग्रहासमोर काहीच चालत नाही. मग तो जातो त्यांच्या सोबत. तो जातो खरा त्यांच्या सोबत. धापा टाकत सगळे डोंगर माथ्यावर पोहचतात. पण कसला पाऊस आणि कसलं काय.. सगळीकडे लख्ख ऊन. त्याच्या पोळलेल्या मनाला चटके देणारं. ऐन पावसाळ्यातही डोंगरमाथ्यावर चक्कं रखरखतं ऊन.

त्याला वाटतं ती सोबत नाही म्हणुनचं पाऊस आला नाही. पण घरच्यांची परवानगी घेवून ती उशिरा का होईना डोंगरमाथ्यावर पोहचते. आणि ती जेव्हा दूर वाटेच्या वळणावर त्याला दिसते तेव्हा त्याच्या ओठांवर तर हसू फुलतचं पण आकाशातला ढगांचं रूप घेवून आलेला घननिळा हसू लागतो. टपोऱ्या थेंबांच रूप घेवून तिला स्पर्शु पाहतो आणि रिमझिमत बरसतो. मग जे स्वप्न रंगवले ते पूर्ण होतात. केसातून ओघळणार पाणी घेणारं, चहाच्या कपातला घोट पाजणारं, आणि भजी घेताना भांडणार. अशी गोष्ट माझी तिची आणि पावसाची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *