घार आणि शेतकरी

एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला.

तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, ‘दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, ‘अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?’ असे म्हणून त्याने तिला ठार मारले.

तात्पर्य

– जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *