एक तहानलेला घोडा एका ओढयावर पाणी पिण्यास गेला असता, एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोडयास पाणी पिऊ देईना, त्यामुळे त्या दोघांचे भांडण जुंपले. रानडुक्कराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोडयाने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंत मान्य करून हाती शस्त्रे घेतली व त्या घोडयावर बसून तो डुकरास शासन करण्यास निघाला.
ओढयाजवळ गेल्यावर त्याने एक तीर सोडून त्या डुकराचा तात्काळ प्राण घेतला.
आपल्या शत्रूचे आपल्या देखत पारिपत्य झालेले पाहून घोडयास मोठा आनंद झाला, त्याने त्या माणसाचे फार आभार मानले व ‘मला आता घरी जाण्यास आज्ञा असावी’ असे तो म्हणाला. परंतु माणसाने त्यास जाऊ दिले नाही. तो म्हणाला, ‘तुझा मला पुष्कळ उपयोग होईल असे वाटते व म्हणूनच मी तुला माझ्या तबेल्यात नेऊन बांधणार.’ हे ऐकताच, क्षुल्लक गोष्टीसाठी आपले स्वातंत्र्य कायमचे गमाविल्याबद्दल घोडयास फार पश्चात्ताप झाला.
तात्पर्य :- दुसर्याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो, तेव्हा ती गुलामगिरी कायमचीच आपल्या गळ्यात पडेल की काय याचा चांगला विचार केला पाहिजे.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply