चांदोमामा

फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेंव्हा फक्त सूर्यच आकाशात होता, चंद्र अजिबातच नव्हता. फक्त सूर्यच असल्यामुळे पृथ्वीवर कधी अंधारच होत नसे नेहमीच उजेड रहात असे. त्यामुळे पृथ्वीवर राहणारी माणसे सतत कामात असत. त्यांना विश्रांती कधी घ्यावी हे समजत नसे. सतत काम करत रहायल्यामुळे त्यांना थकवा येत असे. चिडचिड होत असे.

एकदा देवबाप्पाने पृथ्वीवरच्या माणसांची भेट घ्यायचे ठरवले. तो पृथ्वीवर आला तेंव्हा माणसे काम करत होती. देवाने माणसाला विचारले, ” तू तुझे हे शेत कधी नांगरले ?” माणूस उत्तरला, “आज”. देवाने दुसर्‍या माणसाला विचारले,” झाड लावण्यासाठी तू हा खड्डा कधी खणलास?” माणूस म्हणाला , “आज”. देवाने परत तिसर्‍या माणसाला विचारले,” झाडावरची ही फळ कधी पिकली?” तिसरा माणूस हसून म्हणाला,”आजच”. देवाला आश्चर्य वाटले. आणखीन खात्री करुन घेण्यासाठी त्याने आपल्या मुलाला घेऊन जाणा-या बाईला विचारले,”ह्याचा जन्म कधी झाला”. बाई कौतूकाने म्हणाली,”आज”.

हे ऐकल्यावर देवाला समजून चुकले की पृथ्वीवरच्या माणसांना वेळेचे अजिबातच भान नाहीये. त्यांना कधी कुठले काम करावे, किती वेळ करावे हे समजत नाही. त्यावर उपाय म्हणून देवाने सूर्याला बारा तासांनंतर अस्त व्हायला सांगितले आणि बरोबर बारा तासांनी परत उदय व्हायला सांगितले. आता पृथ्वीवर बारा तासांनी अंधार व्हायला लागला.

अंधारात लोकांना काही दिसेनासे झाले. धडपडू लागले. काहीच काम होईना म्हणून नाईलाजाने झोपू लागले. काही दिवसांनी चौकशी केल्यावर देवाच्या लक्षात आले की माणसांना संपूर्ण अंधाराची खूपच गैरसोय होते आहे. त्यांना थोडातरी प्रकाश पाहीजे. त्यासाठी मग त्याने शांत आणि शितल असणार्‍या चन्द्रदेवाला पृथ्वीवर येण्याची विनंती केली. पांढराशुभ्र चन्द्रप्रकाशात पृथ्वीवरच्या माणसांनाही शांत वाटू लागले. झोप येऊ लागली. माणसांचा वेळ रात्र आणि दिवस ह्यात वाटला गेला. अश्या तर्‍हेने पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस सूर्यासोबत कामात आणि रात्र चन्द्रासोबत आरामात जाऊ लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *