चोराच्या मनात चांदणे

नोकराची लबाडी

एका गृहस्थाकडे कामाला तीन नोकर होते. तो त्यांच्याशी खूप चांगला वागत असे. तो त्यांना परके न मानत आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती समजून घरातील लोक जे अन्न खात असत तेच तो त्या नोकरांना देत असत. फक्त त्या गृहस्थाला लबाडी केलेली अजिबात आवडत नसे. तसे दिसले तर मात्र त्याचा खूप संताप होत असे.

एकदा घरात सण असल्यामुळे जेवणात गुलाबजाम केले होते. त्याच्या प्रेमळ पत्नीने ते सर्वांनाच आग्रह करून पोटभर वाढले होते. त्याचप्रमाणे त्या तीन नोकरांनीही वाढले होते. जेवणे झाल्यावर पंधरा ते वीस गुलाबजाम उरले ते तिने भांडयात काढून ते भांड एका कपाटात ठेवले. सकाळी उठल्यावर जेव्हा तिने त्या भांडयात पाहिले तर काय निम्मे गुलाबजाम संपलेले होते. तिने प्रथम आपल्या मुलांना विचारले. तेव्हा त्यांनी आम्ही हात सुध्दा लावला नाही असे सांगितले. ते ऐकून तिने आपल्या पतीस त्या चोरीविषयी सांगितले.

त्या गृहस्थाला माहित होते की आपल्या मुलांपैकी कोणीही खोटे बोलणार नाही. मग त्याने तिन्ही नोकरांना बोलावून विचारले की, गुलाबजाम कोणी चोरून खाल्ले. तिघांनीही ते खाल्ले नसल्याचे शपथ घेऊन सांगितले.

ते ऐकून गृहस्थ मुद्दाम खोटेच म्हणाला, “हे बघा ही चोरी तुमच्यापैकीच एकाने केली आहे अशी मला खात्री झाली आहे. कारण, ज्याने गुलाबजाम खाल्ले त्याच्या सदऱ्यावर पाकाचे थेंब दिसू नये अशी काळजी घेतलेली नाही. त्याचे ते बोलणे ऐकून गुलाबजाम खाणाऱ्या नोकराने लगेच घाबरून जाऊन सदऱ्याकडे बघितले तेव्हा लगेच त्याने ते खाल्ल्याचे त्याला समजले.”

मग तो रागावून त्या नोकराला म्हणाला, “खरे तर तुझ्या सदऱ्यावर पाकाचे थेंब पडलेले नसतानाही मी मुद्दाम चोर शोधण्यासाठी तसे म्हणालो. पण म्हणतात ना ‘चोराच्या मनात चांदणे’. त्याप्रमाणे तू तुझ्या सदऱ्याकडे पाहिलेस आणि चोरी केल्याचे कबूल केले आहे. आता तू चोरी कबूल कर नाही तर मार खायला तयार हो.”

त्याने असा दम दिल्यावर नोकर घाबरला व त्याने कबूल केले. आणि आता पुन्हा असे करणार नाही म्हणून मालकाकडे क्षमा मागितली. म्हणून मालकाने त्यास नोकरीवर राहू दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *