टोपीविक्या आणि माकडं

करीम ज्युनियर टोप्या विकून परतत होता. रस्त्यात त्याला ते झाड नेहमीच खुणावायचे. याच झाडावरच्या माकडानी काही पिढ्यांपूर्वी त्याच्या खापरपणजोबांच्या टोप्या पळवल्या होत्या आणि मोठ्या चातुर्याने त्यांनी त्या परतही मिळवल्या होत्या.

हल्ली त्या झाडावरची माकडं कमी झाली होती तरी या पिढीतील काही हुप्पे अजूनही त्यावर राहात होते. दाढी वाढलेले बेढब हुप्पे तसे थोडे उग्रच दिसत होते. करीम ज्युनियर त्यांच्या वाटेला कधीच जात नसे आणि ते झाड तो जाणीवपूर्वक टाळत असे.

आज मात्र तो पार थकला होता. दूरवर विश्रांती घेण्यासारख एकही झाड नव्हत. नाईलाजाने तो झाडाखाली बसला. टोप्यांची थैली त्याने अगदी छातीशी कवटाळून ठेवली. थोड्यावेळाने त्याला डुलकी लागली.

जागा होउन पाहतो तर काय त्याच्या टोप्या घालून हुप्पे झाडावर बसले होते. त्याला आता आपल्या पूर्वजाने लढवलेली शक्कल आठवली. त्याने आपली टोपी काढून जमिनीवर फेकली. हुप्पे मात्र टोपी घालुनच आनंदाने उड्या मारत होते. ही शक्कल काही कामी आली नाही. शेवटी त्याने हात जोडून हुप्प्याना टोप्या परत करण्याची विनंती केली. वरुन एक हुप्प्या ओरडला “वेडा आहेस का. अरे आमचा एक दूरचा नातलग दाढी वाढवून आणि टोपी घालून प्रसिद्ध गायक बनला. आम्हीही कधीचे दाढी वाढवून टोप्यांची वाट पाहात होतो!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *