टोळ आणि मुंग्या

By | May 20, 2020

उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, ‘बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.’

हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, ‘अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?’ टोळ त्यावर उत्तरला, ‘माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला.

पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.’ हे ऐकून मुंगी म्हणते, ‘अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?’

तात्पर्य

– ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *