तळमळीने देव भेटतो

बालमित्रांनो, आपल्याला ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी तीव्र तळमळ असावी लागते. तळमळीनेच ईश्वराची प्राप्ती करता येते. अशाच तीव्र तळमळीचे उदाहरण असलेली प.पू. रामकृष्ण परमहंस यांची एक गोष्ट आज आपण पाहू.

प.पू. रामकृष्ण परमहंस यांच्या आई-वडिलांनी गरिबीत दिवस काढले. भुकेलेल्या गरिबाला तोंडचा घास देऊन ती दोघे स्वत: सारा दिवस उपवास करत. अशा परोपकारी वृत्तीच्या आई-वडिलांच्या पोटी या मुलाचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यामुळे त्यांना स्वत:च्या उपजिवीकेचा मार्ग शोधावा लागला. त्यांनी कोलकाताजवळच्या दक्षिणेश्वर या गावी एका देवळात पुजारीपण स्वीकारले. ते प्रतिदिन देवी महाकालीची पूजा करत. त्यांना देवीशी बोलावेसे वाटे. देवाच्या मूर्तीत खरेच काही तथ्य आहे का, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली. काय केले, तर ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होईल, हा एकच ध्यास त्यांना रात्रंदिवस लागला.

दिवसेंदिवस ते व्याकुळ होऊन देवीच्या दर्शनासाठी रडत असत. ते देवीला म्हणत, ‘माते, तू खरोखरच आहेस ना ? ईश्वराचे दर्शन घडू शकते कि नाही आणि ते कशाने घडेल ?’ या एकाच विचाराने त्यांना काही सुचेनासे झाले. त्यामुळे नियमितपणे पूजा करणे, विधीनियमांचे योग्य पालन करणेही त्यांना हळूहळू अशक्य झाले. मातेच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन कधीकधी ते आपले तोंड भूमीवर घासत आणि रडत रडत प्रार्थना करत, ‘देवी, तू माझ्यावर दया कर. माझ्या हृदयात तुझ्याविना आणखी कशाचीही आस उरणार नाही’, असे कर.”

त्यांनी ऐकले होते की, मातेसाठी सर्वस्वाचा त्याग केल्याविना ती कधीच दर्शन देत नाही. त्यानुसार त्यांनी आपले जीवन घडवण्यास प्रारंभ केला. संग्रही जो काही पैसा होता, त्याचा त्यांनी त्याग केला आणि शपथ घेतली की, पैशाला कधीही स्पर्श करणार नाही. हे सर्व त्यांनी पूर्णपणे कृतीत आणले. सगळे जण असेच समजत की, या पोराचे डोके बिघडले आहे.

याप्रमाणे दिवसामागून दिवस आणि मासामागून मास जात होते. सत्य लाभासाठी अविरत प्रयत्न करण्यात निघून गेले. त्या मुलाला नाना दर्शने प्राप्त होऊ लागली. त्याला अद्भुत रूपे दिसू लागली. स्वत:च्या स्वरूपाचे रहस्य हळूहळू त्याला उकलू लागले. जगन्मातेने स्वत:च गुरु होऊन त्या मुलाला साधनेची दीक्षा दिली.

मुलांनो, आपल्याला ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी तीव्र तळमळ असावी लागते. तळमळीनेच ईश्वराची प्राप्ती होते. आर्ततेने ईश्वराला हाक मारली, तर तो धाऊन येतो आणि त्याचे आपल्याला दर्शन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *