दुसर्‍यांना मदत

टीना तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणून तिचे सर्व लाड पुरवले जात होते. तिला कुठल्याही गोष्टीला नाही ऐकायची सवय नव्हती. मागितलेली गोष्ट मिळाली नाही की रडून घर डोक्यावर घेत असे. तिला कोणाशीच काही शेअर करायला आवडायचे नाही. खाऊ, पुस्तक, खेळ असे काही सुध्दा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करायची नाही. उलट त्यांच्याबर दादागिरी करायची. त्यामुळे टीनाला वर्गात एकही मित्रमैत्रिण नव्हते. हया गोष्टीचे टीनाच्या आईला खूप वाईट वाटायचे.

एकदा टीनाच्या वर्गात गौरी नावाची नवीन मुलगी आली. नवीन असल्यामुळे टीचरांनी तिला टीना शेजारी बसवले. टीना अर्थातच स्वत:हून तिच्याशी बोलायची नाही. पण गौरी मात्र तिच्याशी बोलायची आणि टीना सांगेल तसे वागायचीसुध्दा! परीक्षेत गणितात गौरी नापास झाली आणि टीनाला मात्र पैकीच्या पैकी मार्कस मिळाले. टीनाच्या आईला कळल्यावर आई म्हणाली ” टीना, अग तुला गौरीला मदत करायला हवी. तुला जर एखादी गोष्ट येत नसेल तर तू तिला समजावून सांगायला हवीस.” टीनाने आईकडे सरळ दुर्लक्ष केले. मग मात्र आईने सांगून टाकले, “जर टीना गौरीला मदत करणार नसेल तर तिला घरात कार्टून पाहता येणार नाही”. हे ऐकल्यावर नाईलाजाने टीनाने गौरीला मदत करायचे ठरवले. आता टीना गौरीला रोज गणित शिकवू लागली. रोजच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आणि पुढच्या परीक्षेत गौरीला गणितात उत्तम मार्कस मिळाले. गौरीने सर्व वर्गासमोर टीनाचे आभार मानले. पण टीनाला मात्र त्याचे काहीच वाटले नाही. तिने तर कार्टून बंद होईल हया भीतीने मदत केली होती ना !

निर्मळ मनाची गौरी टीनाला मदतीची परतफेड कशी करता येईल हयाची संधी शोधत होती. एकदा टीना आणि वर्गातल्या साहीलचे भांडण झाले. टीनाने त्याला ‘इडियट’ म्हटले. हे शब्द टीचरांनी ऐकल्यावर टीनाला शिक्षा म्हणून संपूर्ण शाळा झाडायला सांगितली. टीनाला तर रडूच फूटले. एवढी मोठी शाळा कशी झाडायची आणि घरी कधी जायचं? ह्याच काळजीत टीना होती. परंतु त्याचवेळेला गौरी टीनाच्या मदतीला आली. टीना आणि गौरीने संपूर्ण शाळा झाडून काढली.

टीनाला गौरीच्या चांगूलपणाची जाणीव झाली. तिने गौरीचे आभार मानले आणि हसून म्हणाली, “A friend in need is a friend in deed”. तेव्हापासून दोघींची छान गट्टी तर जमलीच पण टीनानेही सर्वांना मदत करायला, मिळून मिसळून वागायला सुरूवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *