पेन्सिल एक जीवन

आजी, तू काय लिहितेस? माझ्यासाठी गोष्ट लिहितेस? पिंटूने विचारलं. हो तुझ्यासाठीच लिहिते! पण माझ्या लिहिण्यापेक्षा मी ज्या पेन्सिलीने लिहिते ना, ती पेन्सिलच फार महत्वाची आहे. आजी म्हणाली. ‘हं! काहीतरीच काय!’ नेहमी सारखीच तर आहे. ‘तिच्यात विशेष काय आहे?’ पिंटू म्हणाला. ‘अरे, ही पेन्सिल ना आयुष्‍यात कसं वागावं, कसं जगावं ते शिकवते.’ ‘आजी ही पेन्सिल काय शिकवणार? ‘पिंटूने विचारले. हे बघ, पहिली गोष्ट! पेन्सिल लिहिते, पण तिला लिहितं करणारा हात हा वेगळाच असतो. माणसांचही तसंच आहे! नुसत्या माणसांचंच का, इतर सर्व प्राणी व सर्व सृष्टी यांचा कर्ता करविता हा दुसराच कोणी असतो. त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो.

दुसरं म्हणजे, लिहिताना मधून मधून पेन्सिल तासू‍न तिला पुन्हा टोक करावी लागते. तासताना तिला दु:ख, वेदना जाणवतंच असणार पण ते सहन करून ती पुन्हा नव्यान सुरेक लिहू लागते. आपल्याही आयुष्यात सुख-दु:ख असतात, पण त्यातून न डगमगता त्यातून सुलाखून निघालो की पुन्हा पहिल्या उमेदीनं नव्यांन जगायला ही पेन्सिलच शिकवते.

तिसरी गोष्ट, कधी कधी लिहिलेलं रबरानं खोडून दुरुस्त करावं लागतं. आपल्याही हातून चूका होतात, पण त्या मान्य करून त्या दुरुस्त करणं जमायला हवं.

चौथी गोष्ट, पेन्सिल चांगली का वाईट, हे तिच्या बाह्य रंग रूपावरून समजत नाही. लाकडाच्या आतील शिसे महत्वाचं! तसंच माणसाचं अंतरंग निर्मळ व मजबूत असणं महत्वाचं!

पाचवी, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पेन्सिल दुसर्‍यासाठी स्वत: झिजून नाहीशी होते पण आपण लिहिलेलं मागे ठेवून जाते. तसंच माणसानंही जाताना आपली खूण, आपली आठवण मागे ठेवून गेलं पाहिजे. समर्थांनी म्हटल्या प्रमाणे, ”मरावे परी कीर्तीरूपी उरावे” आपल्या मागे आपलं कर्तृत्व कायम कसे राहिले ते पाहिलं पाहिजे. म्हणून तुला सांगते, तू या पेन्सिली सारखा हो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *