बजरंगबलीला हनुमान का म्हणतात?

सर्वांचे दुःख आणि कष्ट दूर करणारे पावन पुत्र श्री हनुमान सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. खरे म्हणजे अंजनीपुत्राची अनेक नावे आहेत परंतु हनुमान हे त्यांचे नाव सर्वाधिक प्रचलित आहे. बालपणी त्यांचे नाव मारुती ठेवण्यात आले होते पण पुढे त्यांना हनुमान या नावाने ओळखले जाऊ लागले.

एक अत्यंत रोचक प्रसंग आहे ज्यामुळे मारुतीला हे नाव मिळाले. श्रीराम चरित मानस नुसार हनुमानाची माता अंजनी आणि पिता वानरराज केसरी आहेत.

हनुमानाला पवन देवाचा पुत्र देखील मानले जाते. केसरीनंदन जेव्हा अगदी छोटे होते तेव्हा खेळताना त्यांनी सूर्याला पाहिले. सूर्य पाहून त्यांना वाटले की हे एखादे खेळणेच आहे आणि ते सूर्याकडे उडत निघाले.

जन्मापासूनच मारुतीला दैवी शक्ती प्राप्त होत्या. तेव्हा ते काही वेळातच सूर्याच्या जवळ पोचले आणि आपला आकार मोठा करून त्यांनी सूर्य तोंडात घेतला. त्यांनी जेव्हा सूर्याला गिळले तेव्हा सृष्टी अंधारात बुडाली आणि सर्व देवी-देवता चिंतेत पडले. सर्व देवी-देवतांनी मारुतीला विनंती केली की सूर्याला सोडून द्या परंतु मारुतीने कोणाचेही ऐकले नाही. त्यामुळे चिडून जाऊन इंद्राने त्यांच्या मुखावर वज्राने प्रहार केला. त्या प्रहाराने मारुतीची हनुवटी मोडली.

हनुवटीला ‘हनु’ असे देखील म्हणतात. जेव्हा मारुतीची हनुवटी मोडली तेव्हा पवन देवाने आपल्या पुत्राची अशी अवस्था पाहून संतापाने सृष्टीतील वायूचा प्रवाह रोखला. त्यामुळे तर संकट आणखीनच वाढले.

तेव्हा सर्व देवी-देवतांनी मारुतीला आपापल्या शक्ती उपहाराच्या स्वरुपात दिल्या. तेव्हा कुठे पवन देवाचा क्रोध शांत झाला. तेव्हापासून, मारुतीची हनुवटी मोडल्यामुळे सर्व देवी देवतांनी त्याचे नाव हनुमान ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *