भक्ताच्या इच्छेनुसार देवाने काम करणे

देहलीमध्ये एका मंदिरात संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते. खुद्द बादशहाच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. तेव्हा नामदेवांचे कीर्तन एकवेळ ऐकून त्यांच्या संतपदाची प्रचीती पाहण्याचा विचार बादशहाच्या मनात आला. एक दिवस नामदेवांचे कीर्तन चालू असता बादशहा तेथे आला आणि त्याने एक गाय आणवून तिचा तेथे वध करविला. नंतर त्याने नामदेव महाराजांना सांगितले, ‘जर ही मेलेली गाय जिंवत करून उठवशील, तरच तू खरा साधू, नाहीतर तुझा शिरच्छेद करीन.

किती दिवसांत गाय जिवंत करशील ?’ असे नामदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘चार दिवसांत उठवीन”. ते ऐकून बादशहा निघून गेला. हे संकट पाहून नामदेवास फार चिंता वाटू लागली. त्याने पांडुरंगाचा धावा आरंभला. तीन दिवस सारखे कीर्तन करून ‘पांडुरंगा, आता माझा अंत पाहू नकोस. लवकर धाव”, अशी प्रार्थना केली.

चौथ्या दिवशी देवाने नामदेवाच्या अंतःकरणात प्रगट होऊन तात्काळ ती गाय उठवली आणि नामदेवास म्हटले, ‘सावध हो आणि डोळे उघडून पहा’. तेव्हा नामदेव म्हणाला, ‘देवा, चार दिवसांपर्यंत तू माझा अंत का पाहिलास ?’ तेव्हा विठोबा म्हणाला, ‘नाम्या, आताच गाय उठवतो, असे तू म्हणाला असतास, तर मी त्याच वेळी येऊन ती गाय उठविली असती; परंतु तू चार दिवसांची मुदत घेतलीस; म्हणून मला थांबणे भाग पडले. मी तुम्हा भक्तांच्या अधीन आहे. जसे तुम्ही बोलाल, तसे मी त्याच वेळी केल्यावाचून रहाणार नाही’. गाय जिवंत झाल्याची पाहताच बादशहाचा अहंकार गळून पडला आणि तो नामदेवास शरण गेला.

तात्पर्य : दृढ श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर धावून येतोच. याविषयी थोडासुद्धा संशय मनी बाळगू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *