भुताच्या गावात अन बाराच्या भावात . . !

तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणी साधीसुधी कथा नाही तर एक रहस्यमय अशी भयकथा आहे. मुळात ही कथा नसून आम्हाला आलेला एक अनुभव आहे जो तुम्हालाही विस्मयचकीत करून जाईल. “विस्मयचकीत” हा शब्द जर चुकला असेल तर तसे सांगा हा. कारण असा अनुभव या आधी आयुष्यात कधी आम्हाला आला नव्हता ना, तर नक्की काय म्हणतात हे ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला म्हणजे कोणाला? तर आम्ही म्हणजे मुंबईच्या द.ग.डु. अका दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणार्या सात-आठ टवाळ पोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकीची चार वर्षे आम्ही एकही गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ती पुन्हा कधीतरी.

पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौजभ्रमंतीचा म्हणजे पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रूपमध्ये चार पोरे गरीबाघरची असल्याने उरलेल्या चार खात्यापित्या घरच्या पोरांना यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्रीखात्यात उचलावा लागत असल्याने आमची सहल शिमला-कुल्लू-मनाली सारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. आणि तसेही हे शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटींग की काय लावावी लागली होती तिचाही खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचे बजेट तंगच होते. पण म्हणतात ना, “हिंमते मर्दा तो मदते खुदा..” हो ना करता कशीबशी जुळवाजुळव करून आमचा गोव्याला जायचा बेत ठरला.

त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते. गोव्यापासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर. “मौजे येडगाव”, गावाचे नावही कधी ऐकले नव्हते. पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजे मौजे येडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला ये-जा करणेही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत चुलत काका जे सध्या मुंबईतच राहत होते, त्यांनी तिथे एक घर बांधून ठेवले होते. पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते. ज्याचा आता पुढचे चार दिवस आम्ही ताबा घेणार होतो.

कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनसवरून रात्री दहाला सुटणार होती. आम्ही सारे मात्र नऊलाच जमलो होतो. आठ-दहा तासांचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरूरी होते. तसा आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पक्या आणि बाबू सारखी अतरंग कार्टी बरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनाही झोपायला देऊ की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात दोन पेग टाकले आणि त्याला चावी दिली की रात्रभर मनोरंजनाची हमी. कोणी ढोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजन-गाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते.

गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याच्या जोडीने एकेक खंबा मारून आला होता. रात्री तीन वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अश्या रात्री रोज रोज थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाणी गाऊन थकलो तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर बंड्यानेच विषय काढला, “उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग ‘भुताची वाडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. “आईच्या गावात..”, पक्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया. पाठोपाठ एक कचकचीत शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्याची सारी नशा उतरली होती. पक्या घाबरला तसा त्याचा जोडीदार बाबूही घाबरला. पण आम्ही सारे मात्र यामागचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणीही भुताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण काही आम्ही हे नव्हतो. कसेबसे काठावर पास होणारे का असेना, द.ग.डु.ची पोरे होतो.

बंड्याने सांगायला सुरूवात केली, अगदीच काही तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. पण बंड्याच्या खापरपणजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपणजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदारच म्हणा ना.. कै. विष्णूपंत मोरोजी राणे, सहा फूटांच्या वर धिप्पाड शरीरयष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेश्या अश्या पिळदार मिश्या.. जमीनदाराला शोभेलसा पेहेराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर.

हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्यावर उगारायला घेतली आहे असे वाटावे. बंड्या त्यांच्या तैलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा उभी राहत होती. खरी खोटी देव जाणे पण गावात त्यांचा भला मोठा वाडा होता. नाही, नाही.. त्या वाड्यात मुक्काम करणे आमच्या नशिबी नव्हते. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडीकुलुपे लाऊन.. विष्णूपंतांच्या आकस्मिक मृत्युनंतर.. कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले. पण त्यांच्या मृत्युनंतर सार्या गावाला अवकळा आली. विस्मयकारकरीत्या एकेवर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ, असा सलग दोन वर्षे फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली.

परीणामी गावातल्या पोरीबाळींची लग्ने ठरेनाशी झाली. मोठ्या मुश्किलीने गावच्या सरपंचाने आपल्या मुलाचे लग्न जमवले. वरात वाड्यावरूनच निघणार होती, आणि तिथेच घात झाला. बघता बघता वाड्याच्या प्रांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले, कसे झाले, कोणालाही समजले नाही, आणि ते सांगायला त्या सार्यांपैकी एकही जण जिवीत उरला नाही हे ही एक कोडेच होते. बस्स.. त्या नंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरूवात केली. बघता बघता सारा परीसर निर्जन झाला. काही वर्षे उलटली. लोकांची भिती चेपली. मधल्या काळात फारसे अघटीत असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसायला सुरूवात झाली. पण त्या वाड्याच्या वाटेला जायची आजतागायत कोणाची हिंमत झाली नव्हती.

आता याला धाडस म्हणा की मुर्खपणा पण आम्ही तोच करायला चाललो होतो. बंड्या ज्या घराची चावी घेऊन आला होता ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधलेले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसत्या अफवांनी तो वाडा कुप्रसिद्ध झाला आहे तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहणार्या लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिडावे की रडावे ते कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसे झाले असते. थेट गोवा गाठावा किंवा कुठेतरी खाजगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर तेवढे पैसे बरोबर नव्हते. हो ना करता कशीबशी मनाची समजूत काढली. काहीजण अजूनच पिल्यातच होते त्यांनी आमच्या हो ला हो मिळवली. आणि सरते शेवटी आम्ही भुताच्या वाड्यावर स्वारी करायला सज्ज झालो.

कोकणरेल्वेच्या कुडाळ स्टेशनवर आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन होते. ते ही सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर. सात-आठ जण आणि सोबत सामान, बसपेक्षा रिक्षाचाच पर्याय सोयीस्कर होता.

स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली पण एक रिक्षा मिळेल तर शप्पथ.. ज्याला विचारावे तो त्या गावाचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच वर उलट आम्ही कुठून आलो आहोत याची अशी काही चौकशी करायचा की आमचे काही बरे वाईट झाले तर तो आमच्या घरी निरोप पोहोचवणार होता.

आतापासूनच सारे संकेत असे मिळत होते जे आमचे खच्चीकरण करत होते. पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण टाकली होती. शेवटी एका रिक्षावाल्याचा सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बसस्टॅंडपर्यंत जायचे ठरवले. आणि तिथून मग पुढचा प्रवास एस.टी. च्या लाल डब्यातून होणार होता.

लाल डबा कसला, कळकट मळकट, धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता तो. दिवसभरात एकच बस होती जी वर्सोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून पंधरा किलोमीटर आत वसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईयेईपर्यंत तिच्यात फक्त आम्हीच शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला एक धोतरवाले मामा होते, पण ते कुठल्या गावाला उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीत होता पण बसची हालत पाहता नक्कीच त्यामानाने चांगला होता. तरी वाद घालण्यात अर्थ नव्हता. इथून पुढे कसे जायचे याची कल्पना नव्हती.

म्हणून विष्णूपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णूपंत म्हणजे बंड्याचे खापरपणजोबा नाही बरे का, तर मगासचे ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता एव्हाना आम्ही त्यांचे विष्णूपंत असे नामकरण करून त्यावरून बंड्याला चिडवून झाले होते. आम्ही त्यांना विचारणार त्या आधी त्यांनीच आम्हाला भुवया ताणून इशार्यानेच “कुठे?” असे विचारले. “भुतांची वाडी”, बंड्या उत्तरला. “बरं बरं..”, सकाळपासून मौजे येडगाव आणि भुताची वाडी ही नावे ऐकल्यावर ही पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हायसे वाटले. जर या आजोबांनीही डोळे वटारले असते तर इथूनच परतलो असतो अश्या मनस्थितीला येऊन पोहोचलो होतो. पण आता मात्र त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले.

रस्ता खूप सोपा होता. झर्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते, ते ग्रामदेवतेचे मंदीर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भुताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायला अजून अवकाश होता तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळाट करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानांचे द्रोण बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतली. एवढे रसाळ फळ आजवर कधी चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आलेले उन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाने आणि जागरणीने थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे आणि तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरेच या परीसरात एक प्रकारची जादू होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवले होते या जागेला. ग्रामदेवतेचे मंदीर तर पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. भिंती भंगल्या होत्या पण खांबांवरची नक्षी त्या काळच्या अप्रतिम कारागिरीची साक्ष देत होती. त्यावर पसरलेल्या वेलबुट्ट्या त्याच्या सौंदर्यात नकळत भर टाकत होत्या. मंदीराच्या आवारात पसरलेला हिरवागार गालिचा, मधोमध असलेले तुळशी वृंदावन, कुंपणापलीकडे चरणार्या गाई आणि सोबतीला पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत. अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिपण्यासाठी तर आम्ही कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रणातच गेला. अश्या पवित्र आणि मंतरलेल्या परीसरात भूत काय भुताची सावली देखील असणे शक्य नव्हते. ग्रामदेवतेसोबत असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्यांचा उच्चार करायलाही घाबरत होतो त्या भुतांच्या नावाने आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोहोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या एकमजली वाड्याचे. जळाल्याच्या खुणा अंगावर मिरवत दिमाखाने आमच्याकडे पाहत उभा होता. त्याच्यासमोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटीसमान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटक टाळे लाऊन बंद केले होते. तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी पडझड झाली होती. एखादे कुत्रेही आरामात त्यावरून तंगडे टाकून जाऊ शकत होते. तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावराचा लवलेश दिसत नव्हता, ना मगासची पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भागात. तरी तिला भयाण म्हणता आले नसते. अजून रात्र होणे बाकी होते, पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने भुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो तसे बंड्या ओरडला, “कोणीही जादा हुशारी करायची गरज नाही, पुढचे चार-पाच दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत.” बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमताने पास झाला. कारण कोणी कबूल नाही केले तरी एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात होतीच.

बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसांपासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते. तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतरस्त्र पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवराआवर करण्यात जराही रस नव्हता. होस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसार्यात राहण्यात जराही अडचण नव्हती. घरही दोन खोल्यांचेच होते. एक बाहेरची मोठी खोली, आणि आतले स्वयंपाकघर, ज्याच्या कोपर्यातच एक मोरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. पण त्यासाठीही हातपाय झाडणे गरजेचे होते. बरोबर काही कडधान्ये, तांदूळ, अंडी आणि नूडल्सची पाकिटे घेऊन आलो होतो. सद्य परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपर्यातील अडगळीतून स्टोव्ह आणि एक-दोन टोप शोधून काढले आणि सर्वांसाठी एकत्रच मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तसे सारे जण जागीच लुडकलो. डोळ्यांवर झापड होतीच. बघता बघता सार्यांचा डोळा लागला. वेळ काय झालीय याचे कोणालाही भान नव्हते, ना कोणाला पर्वा होती. उठलो तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता. संध्याकाळ उलटून गेली असावी. एकाला जाग आली तसे एकेक करून सारे उठले. जे अजूनही सुस्तावून पडले होते त्यांनाही लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विचबोर्डजवळ दोन पाली नजरेस पडल्या तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असता दिसून आले की इथे तर पालींचे साम्राज्य पसरले होते. पालीही कसल्या, तर त्यांचा आकार पाहता भिंतीवरचे सरडे वाटावेत. एक बरे होते की सार्याजणी निपचित पडून होत्या. आम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. निदान या परीसरात आपण सोडून आणखीही कोणी सजीव प्राणी वास करून आहे यातच समाधान मानले.

पक्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो न मिळो, पण सकाळ संध्याकाळ दोन वेळ तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा आणि दूधपावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती आंघोळ करण्याची. त्याशिवाय प्रवासाचा शीण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता पण त्यावरती पसरलेला धुळीचा जाडसर पापुद्रा पाहता ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथवर पोहोचत होता. आंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहीरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. पाणी काहीतरीच थंडगार होते. प्रत्येकाने कसेबसे दोन तांबे अंगावर ओतून आटोपले. खरे तर आधीची मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती. पण बंड्याच्या काकांनी ती बुजवून ही बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा एक कुतूहल निर्माण व्हायचे पण एक अनामिक भितीही मनात दाटून यायची. सर्वांच्या आंघोळी उरकल्यावर अर्धेजण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही तीन-चार जण तिथेच बसून राहिलो. पुरेशी झोप झाल्याने बर्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्याने सिगारेट शिलगावली. दोन-चार वेळा धूर आतबाहेर केला तसे जरा तरतरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंदी जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता. पण गप्पाही रंगात आल्या होत्या, त्यामुळे कोणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णूपंतांचा विषय निघाला. “थेरडा मेला आणि सारा गाव बदनाम करून गेला”, पक्या सहज म्हणाला तसे एका बोक्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढर्या रंगाचा, पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्यावरच नजर लाऊन होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शीर आणि धड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळही त्याने अशी साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडे चरकलोच. तरी पक्या हिंमत करून म्हणाला, “या विष्णूपंत या, तुम्हीही दोन झुरके मारा आमच्याबरोबर.” पक्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्याचे गुरगुरणे जास्तच वाढले. त्याला ‘शुकशुक’ करून हाकलायचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याचे लाल होत जाणारे डोळे आम्हालाच तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होते. “चल मरू दे त्याला, जाउया, खूप भूक लागली आहे”, बाबू म्हणाला तसे सारे जण पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून निघालो.

आम्हाला खाली हात परतलेले पाहून बंड्याने आंघोळीच्या बादल्या बरोबर घेऊन नाहीत का आला याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चरकलो. डोळ्यासमोर परत तोच बोका आला. तिथे आता परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊ लागलो तसे बंड्याही काय ते समजला. त्यानेही मग विषय ताणून धरला नाही. जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दालखिचडीचा खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेले लोणचे होते. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावच्या वातावरणाची जादू म्हणा, सारे जण अधाश्यासारखे जेवणावर तुटून पडलो. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला की स्वयंपाकघरातील फडताळावर सापडले. “एवढे जुने असूनही रस चांगला निघाला रे””तर्कात” बसत नव्हते. एव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारखे घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावा काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. पाच-दहा मिनिटांनी आवाज थांबला. पण तो केवळ जाहीरातींचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाली. मध्येच आवाज काही काळासाठी थांबायचा आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी मे महिन्यात इथे गारा नक्कीच पडणार नव्हत्या. आणि खरोखरच पडत असल्या तरी अशी आवाजाची उघडझाप करत पडल्या नसत्या. दार उघडून बघायचीही सोय नव्हती. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारच नजरेस पडला असता. नाही म्हणायला एक टॉर्च जवळ होता पण त्याचा प्रकाशही जेमतेम दहा पावलांवर जाऊन थांबेल एवढाच होता. दुष्काळात तेरावा महिना, आगीतून फोफाट्यात या आशयाच्या सार्या म्हणी एकाच वेळी आठवल्या जेव्हा बाबूने सांगितले की त्याच्या पोटात कळ मारतेय आणि त्याला त्वरीत परसाकडे जाणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात सार्यांचे नाक चुरचुरले तसे जाणवले की तो सांगतोय त्यात खरेच तथ्य आहे. आता खरी पंचाईत झाली. बाथरूमला जायची सोय आत होती पण संडास मात्र बाहेर होता. बाबूनेही धमकी दिली की जर काही मार्ग नाही काढला तर तो आत मोरीतच करेन. आणि हे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. बाबूला आता भुताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणत्याही परीस्थितीत हलके होणे गरजेचे होते.

कौलांवरचा आवाज गेले पाच-दहा मिनिटे थांबला होता. तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षाही याची भिती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन सर्वात पुढे होता. पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. सार्यांनी प्रत्येकाकडे देवाचे चिन्ह असलेली एखादी चैन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेतली. बंड्याने दरवाजा उघडून पहिला चारही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही ना हे बघितले. बंड्याचे खरेच कौतुक वाटत होते. तसा तो मुळातच धाडसी होता, पण इथे आपल्यामुळे बाकीचे सारे संकटात सापडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *