महाराष्ट्र दिन

By | May 20, 2020

अनेक राज्ये मिळून भारत देश तयार झाला. त्यातील ‘महाराष्ट्र’ हे आमच्या भाषिक राज्याचे नाव आहे. महाराष्ट्राचा इतिहास सर्वथैव शोभणारा, भूषविणार असा असून, भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासात महाराष्ट्राच्या पराक्रमाचा इतिहास आहे.
साधुसंतांनी येथे सामाजिक, धार्मिक क्रांतीने जनतेला जागृत केले तर शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवून इतिहास घडविला. थोर पुरुषांनी येथे जन्म घेऊन हे राज्य वैभवशाली केले.
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्या हाती महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मंगलकश, त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुपूर्द केला.
त्यापूर्वी गुजरात, मध्यप्रदेशातील काही भाग, आंध्र व म्हैसूर (कर्नाटक) ह्यातील काही भाग मिळून मुंबई प्रांत तयार झाला होता. पुढे गुजराती व मराठी बांधवांचे द्विभाषिक राज्य अस्तित्वात आले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दीर्घकालीन संघर्षांनंतर मराठी भाषिकांचे मुंबईसह ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाले. या निमित्ताने १ मे हा महाराष्ट्र राज्याचा श्रापानं दिन म्हणून साजरा केला जातो.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या संग्रामात महाराष्ट्राचे महाभारत ज्यांनी घडविले त्या सेनापती बापट, एस. एम. जोशी, कॉ. डांगे, आचार्य अत्रे इत्यादींनी भाषणांच्या तोफा डागून विरोधकांची पाळता भुई थोडी केली. या झालेल्या संघर्षात १०५ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. मुंबई महाराष्ट्राला कोणत्याही परिस्थितीत द्यावयाची नाही , अशी घोषणा काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी केली होती. परंतु समितीच्या जण आंदोलनाच्या प्रचंड रेट्यापुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ‘ हा जो महाराष्ट्र धर्माचा महामंत्र समर्थांनी उच्चारला तो समितीने खरा केला.
अशा या महाराष्ट्र राज्याबद्दल जितके लिहावे तितके कमीच आहे.
महाराष्ट्र हे जसे वीरांचे आणि संतांचे राज्य आहे, तसे कलावंतांचेही राज्य आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग आणि दुर्गम शिखरांच्या मुबलक उपलब्धीमुळे, सहाजिकच शिल्पकलेचा महाराष्ट्र राज्यात जास्तीतजास्त विकास झाला. दुर्ग, देवालय, लेणी, स्तूप, मूर्ती हे महाराष्ट्राच्या शिल्पकलेचे अलौकिक असे रूप आहे. आणि वेरूळ-अजिंठ्याने तर महाराष्ट्राचे नाव जागतिक कलेच्या नकाशात अमर केले आहे.
शिल्पकलेप्रमाणेच चित्रकला, गायनकला, काव्य, साहित्य, नाट्यकला या व अशा इतर अनेक कलांमध्ये महाराष्ट्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
जय हिंद ।। जय महाराष्ट्र ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *