माझी सखी

आज ऑफिस मधून लवकरचं निघाले.. दुपारी आलेल्या एका फोनने फार भावूक झाले मी. माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता परत त्या आठवणी ने मन भिजून गेलं.. बरं नाही वाटत असे सांगून निघाले ऑफिस मधून, सरांनी जरा नाराजीने परवानगी दिली.

घर ऑफिसपासून लांब, ट्रेनने स्टेशनला उतरून नंतर रिक्षा करून कसेबसे घरी आले. मला लवकर आलेले बघून आईने काळजीने विचारले “काय झालं, बरं नाही वाटंत का ? आज लवकर आली आणि चेहरा असा का केला आहेस ?
“काही नाही गं असचं जरा लवकर आले” मी म्हणाले आणि लगेच बाथरूम मध्ये जाऊन चेहरा पाण्याने धुतला, आई ने जर डोळ्यातलं पाणी बघितले असते तर आणखी प्रश्न विचारले असते. फ्रेश होऊन आतल्या खोलीत आले आई ने केलेला चहाचा कप समोर टेबलवर होता, चहा घेता घेता परत एकदा मोबाईल चेक केला प्रियाचा MASSAGE होता. तिने मला व माझ्या दुसऱ्या मित्र मैत्रिणीला तिच्या गावी बोलावलं होते,

प्रिया आणि मी एकत्र कॉलेजला होतो. माझी सर्वात जवळची मैत्रीण, एकदम टोम बॉय बिनधास्त, हसरी आणि हसवणारी, श्रीमंत घराण्यातली आणि मी शांत, लाजाळू, देवभोळी (चुकीच वागाल तर किंवा वाईट बोललं तर आपली पुण्याई कमी होते, लोक नाव ठेवतील असा समज आई ने दिलेला ), घरची आर्थिक परिस्थिती ठीक. विरुद्ध स्वभाव पण तरीही अगदी जिवलग मैत्रीण. कॉलेज संपवून पुढे ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी U.S ला निघून गेली, तेव्हा दोघी गळ्यात पडून फार रडलो, हसलो.

तीन वर्ष तिथे राहून ती परत आली लग्नासाठी आणि त्याचेच निमंत्रण तिने दयाला फोन केला .

“मी जाणारचं नाही, असे मनाशी पक्के केले आणि मोबाईल ठेवला. परत राहून राहून त्याच आठवणी ने मन जखमी होत होते. ऑफिस मधून बाहेर पडल्यावर ते घरी पोहचेपर्यंत तीच मन दुखवणारी आठवणी

आठवणी या अशाचं असतात
कधी हसवतात, तर कधी रडवतात.
आठवणी या अशाचं असतात
शरीर इथे तर मन त्या तिथे झोके घेत असते.
आठवणी या अशाचं असतात
मनाच्या कप्यात बंद झालेल्या हळूच बाहेर डोकावणारी .
आठवणी या अशाचं असतात
त्या परत करता हि येत नसतात..

जेवण करून परत आतल्या खोलीत आले. आई स्वयंपाक घरातील काम आवरत होती. बाबा बाहेरगावी गेले होते म्हणून, मी दोघीच अंथरून घालून लगेच पाठ टेकवली. मला लवकर झोपलेली पाहून का कुणास ठाऊक आईने जवळ येऊन डोक्यावरून हलकेच हात फिरवला, काय नवल त्या स्पर्शात मन आतून दाटून येत होतं डोळे पाणावले तसे कुस बदलून अश्रुंना मोकळे केले. अश्रुचं ना असचं असतं एकदा का वाट दिली का ते वाहतच जातात आणि परत त्याच आठवणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *