माणूस आणि दगड

इसापचा मालक झांथस याला अंघोळ करायची होती म्हणून त्याने इसापला स्नानगृहात लोकांची गर्दी किती आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसाप स्नानगृहाकडे निघाला असता वाटेत एक मोठा दगड पडलेला होता व येणारे जाणारे सर्वजण त्याला ठेचकाळत होते. हे तो पाहात असताना स्नानगृहाकडे जाणार्‍या एका माणसाने तो वाटेतला दगड उचलून बाजूला ठेवला आणि मग तो पुढे गेला. ते पाहून इसापने घरी जाऊन मालकास सांगितले, ‘स्नानगृहात फक्त एकच माणूस आहे.’

ते ऐकून मालक स्नानगृहात गेले असता तेथे बरीच गर्दी असलेली त्यांना दिसली. म्हणून त्याने रागाने इसापला विचारले, ‘अरे, इथे इतकी माणसं असून फक्त एकच माणूस आहे असं तू सांगितलंस याचा अर्थ तरी काय? त्यावर इसापने दगडाची सर्व गोष्ट मालकास सांगितली व तो म्हणाला, ‘ज्या माणसानं तो वाटेतला दगड बाजूला ठेवला तो एकच माणूस या नावास प्राप्त आहे. बाकीची माणसं त्या नावास योग्य नाहीत असं मला वाटते.’

तात्पर्य

– ज्या गोष्टीपासून सतत त्रास होत असता त्याला प्रतिकार न करता त्रास निमुटपणे सहन करीत राहतो त्याला माणूस म्हणण्यापेक्षा पशू म्हणणे अधिक योग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *