माता अंजनी पूर्व जन्मी अप्सरा होती

माता अंजनीच्या संबंधी पुराणांमध्ये उल्लेख आहे की ती पूर्व जन्मी देवराज इंद्राच्या दरबारात पुंजिकस्थला अप्सरा होती. पुंजिकस्थला अत्यंत सुंदर आणि अत्यंत चंचल स्वभावाची होती. याच चंचल स्वभावामुळे ती अनेकदा दुसऱ्यांना दुखवायची. असेच एकदा पुंजिकस्थलाने तपश्चर्येत लीन असलेल्या एका परम तेजस्वी साधुसोबत गैरवर्तन केले. ऋषींची तपश्चर्या भंग झाली. ऋषी अत्यंत क्रुद्ध झाले आणि त्यांनी तिला शाप दिला की एखाद्या वानरी प्रमाणे वर्तन करणारी तू वानरी होशील. असा शाप मिळाल्यावर पुंजिकस्थलाला आपल्या चुकीचा पश्चात्ताप झाला आणि तिने ऋषींची क्षमा याचना केली. ऋषींचा राग शांत झाला तेव्हा ते म्हणाले की शापाचा प्रभाव तर टाळता येणार नाही परंतु तुझे ते रूप देखील परम तेजस्वी होईल.

तुला एक असा पुत्र होईल ज्याचू कीर्ती आणि यश यांच्यामुळे तुझे नाव युगानुयुगे अजरामर होईल. आणि तसेच झाले. अप्सरा पुंजिकस्थलाने वानरराज कुंजर याच्या घरात कन्येच्या रूपाने जन्म घेतला. कुंजरने या कन्येचे नाव अंजनी ठेवले. अंजनीचा विवाह वानरराज केसरी यांच्याशी झाला आणि तिने चैत्र महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेला महावीर महाबली हनुमानाला जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *