“मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही” या सारखे प्रेमातले दुसरे चुकीचे वाक्य नाही.
एक गोष्ट सांगतो, मग बघा पटतेय का माझे म्हणणे, “एक राजा होता, त्याला एक सुंदर मुलगी होती. राजाचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. एकदा ती राजकन्या एका राजकुमारच्या प्रेमात पडली. तिने हि गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. राजाने तिला विचारले कि, “किती प्रेम करतेस त्याच्यावर?” ती म्हणाली, “मी त्याच्या शिवाय जगूच शकत नाही.” राजाने त्यांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवले. त्याने त्या राजकुमाराला बोलावून घेतले. राजकन्या खुश झाली. पण राजाच्या मनात काही वेगळेच होते.
राजकुमार आल्यावर राजाने सैनिकांना आदेश दिला कि, “ह्या राजकुमाराला आणि राजकन्येला एकत्र एकमेकांच्या मिठीत एका खांबाला घट्ट बांधून तळघरात डांबून ठेवा, अन्न देवू नका.” राजकन्या आणि राजकुमार आश्चर्यचकित झाले. पण आता एकमेकांच्या मिठीत राहायला मिळणार म्हणून “खूप खूप” खुश झाले. त्यांनी एकमेकांना मिठीत घेतले, आणि सैन्निकांनी त्यांना बांधून तळघरात कोंडले. पहिल्या दोन तासात दोघांनीही एकमेकांना नजरेत पाहून एकमेकांना बरेच काही सांगून घेतले, पुढच्या दोन तासात एकमेकांच्या मिठीत सुखी संसारची स्वप्ने बघितली,
“आपण हे करू, आपण ते करू, हे घेऊ, ते घेऊ आणि बरेच काय काय…….” पुढच्या तासात तळघरातल्या गरमीने दोघे पण घामाघूम झाले. घामाने चीपचीप झालेली त्यांची शरीरे ओलीचिंब झाली. मिठीत असल्याने जरा जास्तच गरम होऊ लागले, आणि बांधल्यामुळे लांबही होता येत नव्हते. उपाशी पोटात कावळे ओरडत होतेच. हळू हळू दोघांची चीड चीड वाढली. “जरा हात बाजूला कर न, मला गरम होतंय.”
“अगं, मग मी काय थंड हवेत मजा करतोय का? मलाही गरम होतंय”
“आधीच गरम होतंय, त्यात तू डोकं फिरवू नको हा”.
“मी डोकं फिरवतोय?”
“जरा शांत रहा रे उभे राहून राहून पाय दुखतायत माझे.. तुला काय?”
“मी काय मग सिंहासनावर बसलोय का? उगाच बोलत बसू नको. मला जरा शांत राहु दे. गप्प बस जरा. किती बोलतेस तू….” थोड्या वेळापूर्वी स्वर्ग वाटलेली मिठी नरका पेक्षा जास्त त्रासदायक वाटू लागली.
“बाजूला हो रे… काढा मला कोणातरी इथून बाहेर”
“मला पण काही जास्त मजा नाही येतंय तुझ्या मिठीत. तुझे तोंड बघायची पण इच्छा नाहियेय माझी”
“मला तरी कुठे इच्छा तुझे थोबाड बघायची.”
थोड्या वेळाने राजा तळघरात आला आणि दोघानाही विचारले कि,
“आता काय म्हणणे आहे तुमचे?”
दोघेही एकाच स्वरात एकत्र जोरात ओरडून म्हणाले, “सोडा आम्हाला,एक क्षण पण सोबत जगू शकत नाही आम्ही.”
मित्रांनो मी प्रेमाच्या विरोधात नाहीयेय,
“सुंदर जगायचे तर कोण न कोणाची साथ हवीच” पण कोणा शिवाय कोणाचेही काही अडत नाही. दूर गेल्यावर हूर हूर होते मनाची…. मान्य आहे. पण वेळेसोबत सगळे ठीक होते.
देव जन्माला घालताना पण एकटा जीव जन्माला घालतो, आणि मरताना एकटाच जीव घेऊन जातो.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply