मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

हजरजबाबी बिरबल

बिरबल आठ-नऊ वर्षाचा असताना आपल्या वडिलांबरोबर एकदा शेजारच्या गावात असलेल्या नातेवाईकाकडे जायला निघाला. त्यावेळेस बिरबलाची आई त्याला काहीतरी खाऊन जाण्याचा आग्रह करू लागली तेव्हा बिरबल म्हणाला, “आई, मला जर बिलकूल भूक लागलेली नाही तर उगाच खाण्यापिण्यात मी वेळ कशाला घालवू?” असे बोलून तो आपल्या वडीलांबरोबर चालू लागला.

दोन अडीच मैलांची चाल होताच त्याला अतिशय भूक लागली. तेवढयात रस्त्याच्या कडेला ब्रह्मदेवाचे एक देऊळ लागले. तेव्हा थोडीशी विश्रांती घ्यावी या विचाराने बिरबल व त्याचे वडील दोघेही देवळात शिरले.

ब्रह्मदेवाची ती चतुर्मुखी मूर्ती बघून वडील नमस्कार करू लागले तेव्हा बिरबलाला भूक अनावर झाल्यामुळे त्याने गळा काढून जोरात रडण्यास सुरूवात केली. ते पाहून वडिलांनी त्याला विचारले, “बिरबल, तू असा अचानाक एकाएकी का रडू लागलास?”

बिरबलाला वाटले की, आई आपल्याला भाकरी खाऊन निघण्याचा आग्रह करीत असताना देखील आपण तिच ऐकल नाही, तेव्हा आता जर आपण आपल्या रडण्याचं खर कारण सांगितल तर वडिल आपल्याला ओरडतील म्हणून हजरजबाबी असलेल्या बिरबलाने आपलं डोक चालवून उत्तर दिलं, “बाबा, मला एकच नाक असूनही पडस आल्यावर ते वाहू लागलं की ते पुसता पुसता माझ्या नाकी नऊ येतात; मग या चार तोंड असलेल्या ब्रह्मदेवाला पडसं आलं आणि याची चारही नाकं एकाच वेळी वाहू लागली की, या बिचाऱ्याचे किती हाल होत असतील? म्हणून त्याच्या त्या होणाऱ्या हालांची मी नुसती कल्पना केली व मला रडू आले.”

वडिलांच्या लगेच लक्षात आले की, बिरबलाला भूक लागली असल्यामुळे तो रडत आहे परंतु त्याचे ते लटके पण अतिशय चातुर्ययुक्त असे उत्तर ऐकून ते थक्क झाले व त्याची पाठ थोपटून ते त्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पाळण्यात दिसणाऱ्या पायांवरून, तू मोठेपणी एक अतिशय थोर व चतुर मनुष्य होणार. तू जरी आपल्याला भूक नसल्याचे तुझ्या आईला सांगितलेस व काही खाण्याचे नाकारलेस, तरी देखील तुला वाटेत भूक लागणार व मग तू रडू लागणार याची तिला कल्पना होती म्हणून तिने दिलेला हा शिरा तू खा, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *