मैत्रीचे मोल

भुवनचे आईबाबा बंगलोर सारखे मोठे शहर सोडून चिकमगलूर सारख्या छोट्या गावी राहायला आले. बर्‍याच दिवसांपासून त्यांना शहरातले प्रदुषण, आवाज, धूळ आणि वेगवान आयुष्यापासून दूर शांततेत जगायचे होते. त्यांनी विचार केला आठ वर्षाच्या भुवनला ह्या छोटया गावात जुळवून घेणे सहज शक्य होईल. परंतु भुवनला मात्र त्याच्या नवीन शाळेचे मित्र अजिबात आवडले नव्हते. बंगलोरच्या शाळेचे मित्र अत्यंत स्मार्ट होते. नवीन गावातल्या शाळेचे मित्र मात्र त्याला इतके स्मार्ट वाटत नसत. ही मुले इंग्रजीत न बोलता सतत आपल्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडात बोलत आणि डब्यात दहीभात आणत असत. भुवन त्या मुलांपासून अलिप्त राहात असे त्यामुळे वर्गातली मुले त्याच्याशी बोलायला उत्सुक नसत. भुवनला त्यांच्या सारखे झाडावर चढणे, मोठयांची सायकल चालवणे व गावाकडचे खेळ खेळणे अजिबात जमत नसे. वर्गातही अभ्यास करतांना भुवन सतत शिक्षकांच्या पुढे पुढे करायचा त्यामुळे वर्गातली इतर मुले त्याला आपल्यापेक्षा हुशार आणि वेगळी समजत असत. अश्यामुळे शाळेत येऊन इतके दिवस झाले तरी त्याला कुणीच मित्र मिळाले नव्हते. भुवन अगदी एकटा पडला होता.

एके दिवशी तो असाच उदास बसला होता. “माझ्याशी कोणी मैत्री का करत नाही?”, “मला कुणीच खेळायलाही बोलवत नाही”, “ह्या गावात येऊन मी अगदी एकटा पडलो आहे” असे म्हणतांना भुवनला अगदी रडू येत होते. असे म्हणत असतांनाच त्याच्या टेबलवर एक पिवळा-नारिंगी प्रकाश भुवनला दिसला. त्या पाठोपाठ डोक्यावर सोनेरी मुकूट घातलेली दीड फूट उंचीची छोटी परी अवतरली. भुवन रडणे थांबवून तिच्याकडे पाहू लागला. परी म्हणाली,” भुवनबाळा तुझे दुःख मी जाणते. सगळी मुले तुझ्याशी खेळायला लागतील. मैत्री करतील. मात्र त्यासाठी तुला बरेच बदलावे लागेल. आहेस तयार ह्या सार्‍यांसाठी”. भुवने आनंदाने आपली मान हलवली. तिने तथास्तु म्हटले.

दुसर्‍या दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. भुवनची चित्रकला उत्तमच होती. स्पर्धेसाठी खास त्याच्या बाबांनी त्याला नवीन रंगपेटी बक्षीस दिली होती. पण आज भुवने वेगळाच निश्चय केला होता. शाळेत गेल्याबरोबर त्याने चित्रकलेच्या वृंदा मॅडमला सांगितले की बर वाटत नसल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये. त्याने आपली नवीन रंगपेटीही वर्गातल्या मुलांना वापरायला दिली. वर्गातल्या मुलांना खूपच आश्चर्य वाटले.

मधल्या सुट्टीत भुवन वेगळा न बसता स्वतःहून मुलांच्या गोलात सामील झाला. आईने स्पर्धेच्या दिवसासाठी खास म्हणून डब्यात दिलेला पाईनऍपल केक सगळ्या मुलांना वाटला. सगळ्या मुलांनी मिटक्या मारत आणि भुवनच्या आईचे कौतूक करत केक संपवला. केक संपल्याचे भुवनला अजिबात वाईट वाटत नव्हते. उलट बदल म्हणून त्याने कविताने आणलेला दहीभात खाल्ला. इतक्यात आदित्य आणि ऋषी तेथे आले आणि म्हणाले,”भुवन तुझे टॅटू तू आमच्या कंपासमध्ये टाकलेस का?, आम्हाला कितीतरी दिवसांपासून ते हवे होते. धन्यवाद भुवन.” भुवनेही मान डोलावली पण त्याला माहीत होते की हे सारे छोटया परीने केले आहे. त्याने तिला मनोमन धन्यवाद दिले.

नंतर खेळाच्या तासाला राघव भुवनला मोठी सायकल चालविण्याचा आग्रह करत होता. “तुला वाटत मला हे जमेल?”, भुवनने भीतभीत त्याला विचारले. “हो का नाही. मी आहे ना तुला शिकवायला”, राघव आश्वासक आवाजात म्हणाला. भुवनने चक्क मोठी सायकल चालवून बघितली. थोडयाच वेळात भुवन सार्‍या मुलांबरोबर खेळत होता, मस्ती करत होता, हसत खिदळत होता. चिकमगलूरला आल्यापासून आजचा त्याचा दिवस खूपच आनंदात गेला होता. एका दिवसात अचानक त्याला खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या.

रात्री घरी जाऊन त्याने परीला बोलावले पण ती काही आली नाही. झोपल्यावर मात्र परी त्याच्या स्वप्नात आली. भुवनला म्हणाली,”भुवन आज तुला मी मुलांशी मैत्री करायला मदत केली. आता तू स्वतःहून मित्र जोडले पाहिजेस. तू गुणी मुलगा आहेसच परंतु सर्व मित्रांना मदत करायला आणि त्यांच्या बरोबर जुळवून घ्यायला तुला शिकलेच पाहीजे. त्यामुळेच तू सर्वात ‘बेस्ट’ होशील”. भुवन परीचे म्हणणे ऐकून स्वप्नातच मान डोलवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *