एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला. वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला.
त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, ‘हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.’ ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, ‘बाबा, तू माझी आठवण का केली होती?’ मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्या म्हातार्याला माहीत नव्हते.
मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, ‘मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.’
तात्पर्य
– मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply