म्हातारा सिंह

एक सिंह फार म्हातारा झाला होता. तो अगदी मरावयास टेकला आहे असे कळताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूड घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले. बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जखमी केले. कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याला चावे घेतले.

रानडुकराने आपले सुळे त्याच्या पोटात खुपसले व शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या. त्या वेळी मरावयास टेकलेला तो सिंह म्हणाला, ‘देवा रे देवा, माझी ही काय स्थिती केली आहेस ?’ शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो मी, त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते.’

तात्पर्य

– आपल्या चांगल्या अवस्थेत आपण इतरांना छळतो, पण जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुद्रही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *