मूर्ख उंदीर
एका जंगलात एक सिंह रहात होता. एकदा हा सिंह एका पारध्याने लावलेल्या जाळयात अडकला. तेव्हा त्या अडकलेल्या सिंहाला एका उंदराने ते जाळे आपल्या दातांनी कुरतडून त्याची सुटका केली. त्यामुळे तो सिंह त्या उंदरावर खुश होऊन त्याला म्हणाला, “हे छोटया पण परममित्रा उंदरा, मी तुझ्या कामावर खुप खुश झालो आहे आणि म्हणून तू माझ्याकडे जे मागशील ते मी तुला देईन.”
वनराज सिंहाने आपल्याला ‘मित्र’ असे संबोधले, याचा अर्थ आपण त्याच्या बरोबरीचे झालो, असा गैरसमज त्या उंदराचा झाला आणि म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेल्या त्या अविचारी उंदराला दुर्बुद्धी झाली आणि त्याने सिंहाकडे मागणी केली, “सिंहमहाराज, तुम्ही मला शब्द दिला आहे म्हणून त्यानुसार मी तुमच्याकडे एकच गोष्ट मागतो. तुमची मुलगी मला देऊन तुमचा जावई मला करा.”
उंदराची ती अनपेक्षित मागणी ऐकून सिंहाला जरा हसू आले, तरी पण आपण शब्दात अडकल्यामुळे त्याने त्या उंदराचे म्हणणे मान्य केले.
उंदराला वचन दिल्याप्रमाणे एका मुहूर्तावर उंदराच्या लग्नातील सुरवातीचे काही विधी कसेबसे पार पडले. परंतु सप्तपदीच्या वेळी जेव्हा नवरा मुलगा नवरीसह होमाभोवती प्रदक्षिणा घालू लागला, तेव्हा मात्र त्या धिप्पाड नवरीच्या पायाखाली सापडून चिरडला गेला. तेव्हा तो उंदिर मरता मरता स्वतःशीच म्हणाला, “मी लहान तोंडी मोठा घास घ्यायला गेलो, म्हणूनच मृत्यूची शिकार झालो.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply