वडिलकीचा सल्ला

एक होतं गांव, त्या गावांत एका मुलाचे लग्न ठरले, मुलगी होती शेजारच्या गावातील. तेव्हा शेजारील गावांत लग्न होणार होते. दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती. लग्नात भांडणे व मान अपमान होऊ नये म्हणून लग्नाला वऱ्हाडात कोणाही म्हाताऱ्या माणसांना न्यावयाचे नाही असे तरुण माणसांनी ठरवले.

लग्नाला जाण्यासाठी गाड्या तयार झाल्या. ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्व जण शेजारील गावाकडे निघाले. गावात एक शहाणे समंजस आजोबा होते. ते हळूच आधी शेजारील गावांत गेले व तेथील मंदिरात वेष बदलून राहिले.

ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले. त्यांचे मुलीच्या घरच्या माणसांनी मोठ्या थाटाने आगत स्वागत केले. मुलीच्या कडील माणसांच्या ध्यानात आले की ह्या पाहुण्यांच्या मध्ये एकही वयस्कर माणूस नाही. ही गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही. म्हणून आता या वराकडील लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की, ‘आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसाने द्यावे. ‘

हे मागणे ऐकल्यावर वराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाली. बापरे! आता एवढे तेल आणावे कोठून? सगळे जण आपसात चर्चा करू लागले. वराकडील प्रत्येकाने विचार केला पण कोणाला उत्तर सापडेना. काय करावे! लग्न मोडावे तर परत गावांत गेल्यावर सगळे नांवे ठेवणार! सगळ्यांची तोंडे उतरून गेली. ज्याला त्याला वाटू लागले कीं, आपल्याबरोबर आपण कोणी मोठे माणूस आणले असते तर बरे!

एवढ्यांत वेष पालटलेले त्यांच्या गावचे आजोबा तेथे आले. त्यांनी विचारले, ”कां रे बाबांनो, लग्नघरांत तुम्ही सगळे तोंडे उतरून का बसलात?” तेव्हा त्यातील एक जण म्हणाला,

”काय सांगू तुम्हाला! वधूकडील लोक विहीरभर तेल नजराणा म्हणून मागितं आहेत. कोठून देणार एव्हढे तेल? लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावांतील लोक नांवे ठेवतील, काही सुचत नाही!”

आजोबांनी विचारले, ”तुमच्याकडे कोणी मोठे माणूस नाही का सल्ला द्यावयास? ”

”नाही हो, मुद्दामहून त्यांना वगळले त्याचा आतां पश्चात्ताप होत आहे.”

”बरे! चला मी तुम्हाला सल्ला देतो तसे उत्तर तुम्ही मुलीच्या वडलांना जाऊन द्या.

”म्हणावे, आमची तेलाची विहीर भरून तयार आहे. ती ओतून घेण्यासाठी तुमची पाण्याची विहीर कोरडी करा.”

”अहो आजोबा, आपल्याकडे कुठे तेलाची विहीर आहे.”

”तुम्ही जाऊन तर सांगा. बघा त्यांची विहीर कोरडी होते का?”

वराकडील माणसांनी ते उत्तर मुलीच्या वडिलांना सांगितले. तसे मुलीचे आजोबा हसले व म्हणाले तुम्हाला ज्यांनी उत्तर सुचवले त्यांना घेऊन या.

वराच्या माणसांमागोमाग ते आजोबा पुढे झाले. मुलीच्या माणसांनी त्यांना मानाने बसायवयास लावले. व त्यांची वास्तपुस्त केली तेव्हा त्यांनी आपला वेष उतरवला तो काय वराकडील माणसे चकित झाली. ते त्यांच्यातीलच होते. सर्व वराच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला. ह्यापुढे वयस्कर माणसांचा सल्ला आम्ही घेऊ असे सांगितले. लग्न थाटामाटांत झाले. पुढे कधी कुठलेही कार्य त्या गावांत ठरले की वयस्कर म्हणत, ”आम्ही नाही रे बाबा तुमच्याबरोबर येणार लग्नाला” ह्या वाक्याने गावांत खूप हशा होई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *