वेळेचे महत्त्व

ईशान नेहमीप्रमाणे उशीरा उठला. त्यामुळे सकाळची आवश्यक कामे त्याला घाईने आवरायला लागली. इतक्यात स्कूलबसचा हॉर्न ऐकू आला. “अगं आई, मला ‘टू नंबरला’ लागली आहे” ईशान काकूळतीला येऊन म्हणाला. “अरे केवढा उशीर झाला आहे, आता शाळेतच टॉयलेटला जा.” आई म्हणाली.

शाळेच्या रस्त्यावर खूपच रहदारी असल्यामुळे शाळेत पोहोचायला उशीर झाला. ईशान शाळेत पोहोचला तेंव्हा प्रार्थना होऊन वर्ग भरले होते. त्यामुळे टॉयलेटला न जाता त्याला सरळ वर्गात जावे लागले. जोशी टिचर अफ्रिकेचा धडा शिकवत होत्या. “मुलांनो, अफ्रिकेत रहाणार्‍या मांजरीसारख्या दिसणार्‍या मोठया प्राण्याचे नाव कोणी सांगू शकेल काय?” ईशानने अभावितपणे हात वर केला. सगळा वर्ग ईशानकडे उत्सुकतेने पाहू लागला. ईशान बिचारा दोन्ही पाय एकमेकांवर ठेऊन म्हणाला, “टीचर मी टॉयलेटला जाऊ?” टीचर रागावून म्हणाल्या, “मी सिंह ऐकलाय, वाघ ऐकलाय पण टॉयलेट कुठे ऐकला नाही. गप्प खाली बस.”

थोडयावेळाने छोटी मधली सुट्टी झाली. सारी मुले वर्गातून बाहेर पळत गेली. तुम्हाला माहितीये ना इमर्जन्सी असल्यावर धावणे किती अवघड होतं ते. दोन्ही पाय व पोट आवळून ईशान टॉयलेट पर्यंत पोहोचला तर भली मोठी रांग. त्याचा नंबर येईपर्यंत सुट्टी संपल्याची घंटा झाली सुध्दा. त्यामुळे ईशानला काही न करताच परत यावे लागले.

ईशानचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. जिम्नॅस्टीकच्या तासाला उडया मारणे कठीण गेले. संगीताच्या तासाला सगळेच सूर बेसूर भासले. आवडत्या हिंदीच्या तासाला सुध्दा लक्ष लागले नाही. आता चित्रकलेचा शेवटचा तास चालू होता. एरवी रंगांशी मनसोक्त खेळायला, त्यांच्यात रमायला ईशानला खूप आवडायचं. पण आज मात्र ब्रश हातात पकडण सुध्दा कठीण जात होतं. त्याची अस्वस्थता मंजिरी टीचरच्या लक्षात आली. “ईशान, काही हवयं का?” टीचरेने विचारले. ईशान रडवेला होऊन म्हणाला, “टीचर मला खूप जोरात टॉयलेटला लागलीये हो. मी जाऊ का?” टीचर म्हणाल्या, “अरे आधीच नाही का सांगायचे. आधी जाऊन ये बर”

ईशान टॉयलेटला जाऊन आल्यावर टीचरने त्याला दिवसभर काय घडल्याचे विचारले. ऐकल्यावर टीचर वर्गाला उद्देशून म्हणाल्या, “मुलांनो वेळेच्या आधी थोडे लवकर उठून आपण दिवसाची सुरूवात केली पाहिजे. आपला रोजचा सकाळचा दिनक्रम जसे की अंघोळ, टॉयलेट, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच पण घाई न होता दिवसाची सुरूवात चांगली होते. दिवस अस्वस्थतेत जात नाही. मग उठणार ना उद्यापासून लवकर?”

सगळ्या मुलांनी मोठयाने होsss म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *