संतांची क्षमाशीलता (संतांचा क्षात्रधर्म)

तुकोबांची (संत तुकारामांची) कीर्ती आणि लोकप्रियता दोन विरोधक सन्यांशांस खुपू लागली. तुकोबांच्या द्वेषाने ते अंध झाले. त्यांनी पुण्याचे मोकाशी दादू कोंडदेव यांच्याकडे मागणी केली, ‘देहूच्या तुक्याने सनातन धर्म बुडवण्यास आरंभ केला आहे. तो लोकांना कर्मकांडापासून परावृत्त करून भक्तीमार्गाला लावत आहे. त्याच्या वाणीस लोक भुलून तो शूद्र जातीचा असूनही विरोधक त्यास नमस्कार करत आहेत. त्याने वैदिक धर्माचे अधःपतन चालवले आहे. त्याला बोलावून आपण योग्य ती शिक्षा करावी.’

विरोधक सन्याशांच्या सांगण्यावरून दादोजींनी तुकोबांना जाब विचारण्यासाठी पुण्यास त्वरित बोलावणे पाठवले. तुकोबांनी आज्ञा शिरसावंद्य मानली आणि ते पुण्यास येण्यास निघाले. पुण्याबाहेर मुळा-मुठा यांच्या संगमावर तुकोबांचा मुक्काम पडला. त्या ठिकाणी होणार्‍या कीर्तनास पुणेकरांनी अलोट गर्दी केली. गावोगावीचे लोक तुकोबांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आणि दर्शनासाठी संगमावर गर्दी करू लागले. त्या स्थळाला यात्रेचे स्वरूप आले.

तेव्हा दादोजी कोंडदेवही जिज्ञासेने तेथे गेले आणि तुकोबांच्या कीर्तनात तल्लीन होऊन बसले. तुकोबांची अमृतवाणी ऐकून ते धन्य झाले. त्यांनी आदरपूर्वक तुकोबांना नगरात येण्याचे आमंत्रण दिले आणि दोन सहस्र ब्राह्मणभोजन घालून तुकोबांचा सन्मान करण्यात आला. दादोजींची ही कृती त्या दोन संन्याशांना आवडली नाही. ते म्हणाले, ‘‘या तुकारामाला शिक्षा देण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितले होते. त्याउलट तुम्ही त्याचा सत्कारच करत आहात, याचा अर्थ काय ?’’ त्या वेळेस कोंडदेव म्हणाले, ‘‘तुकोबांसी तुम्ही शास्त्रार्थ वादविवाद करा. जर तुम्ही त्यांना हरवले, तर मी त्यांची गाढवावरून धिंड काढीन. हो; पण लक्षात असू द्या, तुम्ही हरल्यास तुम्हासही क्षमा करणार नाही.’’ त्या दोन विरोधकांनी आव्हान स्वीकारले.

ते विरोधक तुकोबांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. त्या वेळी तुकोबा कीर्तनात दंग होते. त्यामुळे त्यांना चूप रहाण्याविना पर्याय नव्हता. तुकोबांच्या हरिनाम गजराने सारा श्रोतृवृंद डोलू लागला, तेव्हा त्या विरोधकांनी पाहिले तो काय आश्चर्य ! तुकोबांच्या ठिकाणी त्यांना चतुर्भूज पांडुरंगाचे दर्शन होऊ लागले. त्यांच्याशी वादविवाद करण्यासाठी आलेले ते विरोधक ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना आपली चूक कळून आली.

तुकोबा हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहेत, याची निश्चिती पटली आणि त्यांनी तुकोबांचे पाय धरले. तेव्हा कोंडदेवांनी त्या विरोधकांची गाढवावर बसवून त्यांच्या डोईचे पाच पट काढून धिंड काढण्याची सिद्धता केली; पण तुकोबांनी मध्यस्थी करून आणि दादोजींना विनंती करून त्या विरोधकास क्षमा देवविली.

तात्पर्य : कोणी संतांसमवेत कसेही वागले, तरी ते क्षमा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *