संत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता

बालमित्रांनो, साधना केल्यानंतर आपली बुद्धी सूक्ष्म होते; म्हणजेच पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडील संवेदना कळायला लागतात. काही संत एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ किंवा भविष्य यांच्याविषयीची माहिती सांगतात, यालाच सूक्ष्मातील ज्ञान म्हणतात. सर्वसाधारण माणसासारखे भासणारे संत तुकाराम महाराजांनी या ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी कसा केला, हे या कथेद्वारे आपल्याला कळेल.

संत तुकाराम महाराज देहू गावी रहात होते. एके दिवशी त्या गावात एक साधू येणार आहे, अशी वार्ता पसरली. साधूंच्या स्वागतासाठी गावातील लोकांनी मोठा मंडप उभारला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी पुष्कळ दाटी केली. सगळे जण त्यांचे गुणगान गात होते. त्या साधूच्या दर्शनाने आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात, अशी वार्ता गावभर पसरली होती. प्रत्यक्षात साधू गावात आल्यानंतर जो-तो त्या साधूच्या दर्शनाला जाऊन दक्षिणा देऊन अंगारा आणि प्रसाद घेऊ लागला. घरात लक्ष्मी नांदू दे, शेतात पीक येऊ दे, विहिरीला पाणी लागू दे, अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणी गावकरी साधूजवळ व्यक्त करत होते. साधू डोळे मिटून बसत असे. येणारे लोक त्याच्या पायावर डोके ठेवत आणि आपले गाऱ्हाणे ऐकवत. गाऱ्हाणे ऐकून तो त्यांना अंगारा लावे. त्याबदल्यात लोकांना दक्षिणा द्यावी लागत असे. त्यानंतर तो साधू त्यांना आशीर्वाद देत असे.

तुकाराम महाराजांना ही वार्ता कळली. तेव्हा त्यांनी त्या साधूचे दर्शन घ्यायचे ठरवले. साधूच्या दर्शनाला प्रचंड दाटी झाली होती. त्या दाटीतून तुकाराम महाराजांनी हळूहळू वाट काढली आणि ते त्या साधूच्या समोर येऊन बसले. साधू डोळे मिटून स्वस्थ बसला होता. अर्धा-एक घंटा झाला, तरी त्याने डोळे उघडलेले नव्हते. साधू डोळे कधी उघडतो आणि आमच्यावर त्याची दिव्य दृष्टी कधी पडते, याची लोक आतुरतेने वाट पहात होते. तुकाराम महाराजांना मात्र हा साधू कसा आहे, याची पूर्ण कल्पना होती.

काही वेळानंतर साधूने डोळे उघडले. पहातात तर काय तुकाराम महाराज समोर बसलेले आहेत. त्याने तुकाराम महाराजांना विचारले, ”तुम्ही केव्हा आलात ?” तुकाराम महाराजांनी लगेच उत्तर दिले, ”जेव्हा आपण डोळे मिटून मनात विचार करत होतात की, हे गाव बरं दिसतंय. इथली भूमी सुपीक आणि बागायतीची आहे. इथले लोकही आपल्याला फार मान देऊ लागले आहेत, दक्षिणाही भरपूर देत आहेत.

त्या दक्षिणेतून इथली भूमी विकत घेतली आणि इथे उसाची शेती केली, तर उसाचे पीक चांगले येईल. त्यामुळे आपल्याला अमाप धनाची रास मिळेल. त्या राशीची रक्कम आपण मोजत बसला होता, त्या वेळीच मी इथे आलो.” हे उदगार ऐकून त्या ढोंगी साधूचा तोंडवळा एकदम पांढरा पडला. त्याच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडले नाही. आता आपली या गावात काही धडगत नाही, हे त्याने ओळखले. त्याने दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळला आणि कोणालाही न सांगता तो तेथून निघून गेला.

बालमित्रांनो, पाहिलेत ना, ढोंगीपणा कसा उघडकीस येतो ते ! ईश्वर बोलत नाही; पण ईश्वराचे सगुण रूप असलेले संत बोलू शकतात. संत अचूक ओळखतात. तुकाराम महाराजांमुळे लोक त्या ढोंगी साधूपासून बचावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *