समर्थ रामदास

एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुध्द चित्तात कसे पलटवले ते पाहण्यासारखे आहे. ‘ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे,’ असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात आणि म्हणत, ‘ओम भवती भिक्षां देहि l ‘ कुठे अपमान होत असे, कुठे स्वागत होत असे, कुठे त्या गृहस्थांचा किंवा गृहिणींचा राजस अहंकार डोकावत असे. ते बघून समर्थ निर्ममपणे पुढे जात असत. एका गावामध्ये प्रसंग असा आला की समर्थांना अजिबात भिक्षा मिळाली नाही पण समर्थ चिडले नाहीत.

म्हणाले, ‘आनंद !’ रघुरायाचे नाव घेतले ! हेही देणे ईश्वराचे ! त्यात काय कष्ट मानायचे ! त्यात काय दुःख मानायचे ! समर्थ उठून पुढल्या गावात गेले. तिथे गेल्यावर त्यांना अनुभव असा आला की गावात एक प्रचंड चौसोपी वाडा होता. पण त्या वाड्यात सगळी राजस अहंकार धारण करणारी माणसे राहात होती. तिथे समर्थ भिक्षेला गेले. ‘ओम भवती भिक्षां देहि’ असा स्वर कानावर पडला. गृहिणीने उत्तम भिक्षा आणून वाढली. पण त्या देण्यामध्ये असा भाव असे की कसे गोसावड्याला मी देते ! कसा पोटार्थी प्रतिदिन मुकाट्याने भिक्षा घेतो ! असा एक मस्तवाल अहंकार तिच्या मनात दडलेला होता. समर्थांना ते कळायचे.

समर्थ मनोमन हसत आणि म्हणत, ‘रघुराया, सुबुद्धी द्या या गृहिणीला’ आणि मग ती भिक्षा स्वीकारत असत. समर्थांचे कौतुकच असे होते की अन्नातील रस सेवनच करायचे नाहीत, भिक्षा मिळाली की घेऊन जायची आणि नदीच्या पाण्यात धुवून काढायची. गोडही नको, तिखटही रस नको, आम्लही नको, काहीच नको ! सत्वयुक्त अन्न घेऊ. रस नकोतच ! म्हणजे मसाल्याचे पदार्थ नकोत, त्याची चवही नको. धुवून काढायचा पदार्थ आणि खायचा !

मग त्या स्त्रीला वाटले की आता हे समर्थ इथे येतात, इतके दिवस मी भिक्षा वाढते आहे ! आता यांनी मला काहीतरी उपदेश केला पाहिजे. साटलोट ! माणसे देवाबरोबर जिथे साटलोट करतात, तिथे संतांबरोबर केले तर आश्चर्य नाही ! देवा, मी तुला हे दिले, तू मला हे दे. साटलोटचं झालं ना ! देव काय राजकारणी आहे का? की तुम्ही आमच्या पक्षात या, किंवा सह्यांच्या मोहिमेत सामील व्हा ! मग देतो तुम्हाला साडेतीन कोटी, हे काय देव करतो का? पण त्या स्त्रीला असे वाटते की आता आपण सौदा करायला हरकत नाही !

इतके वेळा अन्न खाऊन गेलेत आमच्या घरचे ! समर्थांना आता म्हणायला हरकत नाही. समर्थांना ती गृहिणी म्हणाली, ‘समर्थ, आज भिक्षा वाढते, पण एक मागणे आहे.’ ‘काय?’ ‘मला उपदेश द्या.’ समर्थ हसले, ते म्हणाले, ‘वेळ आल्यावर देईन.’ तिला अपमान वाटला. समर्थ दररोज भिक्षा घेऊन जातात आणि वेळ आल्यावर म्हणजे काय? माझा हक्कच आहे. मुकाट्याने माझ्या चरणांशी बसून उपदेश द्यावा. (म्हणजे उलटे बर का! ) मी नाही बसणार त्यांच्या चरणाशी ! उपदेश तर घ्यायचा आहे. यांना संत म्हणतो पण यांनीच माझ्या चरणांशी बसावे, आणि मला उपदेश करावा.

समर्थ म्हणाले, ‘नाही! वेळ आली की देईन.’ त्या स्त्रीने अगदीच हट्ट धरला. त्यावेळी ते काय म्हणाले, ‘माउली, आत्ता माध्यान्हीचा समय आहे. माझ्या भोजनाची वेळ झाली. उद्या आपल्याला उपदेश देतो.’ ‘बर’ म्हणाली. तिला आनंद झाला. घरी सगळ्यांना सांगितले. कसे गोसावड्याला नमवले, मुकाट्याने मान्य केले.

दुसरा दिवस उजाडल्यावर म्हणे समर्थांनी अशी गम्मत केली, समर्थांनी आपल्या कटोऱ्यात घाण भरली. आणि तसाच तो कटोरा घेऊन गेले त्या वाड्यामध्ये आणि अंगणात उभे राहून साद घातली. ‘जय जय रघुवीर समर्थ ! माउली भिक्षा आणा.

ओम भवती भिक्षां देहि l ‘

त्या गृहिणी बाहेर आल्या आणि आज उपदेश मिळणार म्हणून अधिक प्रसन्न होत्या. म्हणून पायस तयार केले होते. बेदाणे, मनुका, बदाम, केशर वगैरे घातलेले. असे सगळे सिद्ध करून त्यांनी ते पायस, खीर अतिशय सुंदर केली होती. अतिशय चवदार, अतिशय पौष्टिक अशी करून आणली. समर्थ पुढे आले आणि तो कटोरा त्यांनी पुढे केला.

त्या बाई कटोऱ्यात पाहतात तो घाण ! चिखल, गोबर भरलेला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘अहो, हे काय? ही घाण आहे याच्यामध्ये, माझी खीर वाया जाईल.’ यावर समर्थ म्हणाले, ‘चालेल, घाला.’ असे एक दोनदा झाले, तीनदा झाले. चारदा, दहा वेळेला झाले.

त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘असे काय करता?’ त्यांनी ते पातेले बाजूला ठेवले. समर्थांच्या हातातून तो कटोरा काढून घेतला, आणि त्या म्हणाल्या, ‘या घाणीत मी कसे वाढू? हा घ्या कटोरा. शुद्ध करून आणा. जा अगोदर. विसळून घेऊन या.’ गेले समर्थ ! कटोरा स्वच्छ करून आणला आणि त्या माउलीच्या समोर धरला. ती पायस वाढणार, एवढ्यात त्यांनी कटोरा मागे घेतला. ते म्हणाले, ‘उपदेश हवा आहे ना?’ त्यावेळी तिला फार आनंद झाला. समर्थ म्हणाले,

‘पहा बर ! या कटोऱ्यामधे इतकी घाण होती म्हणून तुम्ही पायस त्यात वाढायला तयार झाला नाहीत. तुमच्या चित्तामध्ये अहंकाराची, ‘मी’ पणाची इतकी घाण आहे की ती जोपर्यंत बाहेर निघत नाही, तोपर्यंत मी उपदेशरुपी पायस तुमच्या चित्तामध्ये कसे टाकू?’

हे ऐकले म्हणे ! त्या स्त्रीचा थरकाप झाला. अंधारामध्ये विजेचा लख्खकन लोळ यावा तसे तिला झाले. थरकाप झाला, पाय कापायला लागले. दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले आणि तिने एकदम समर्थांना दंडवतच घातले. म्हणाली, ‘महाराज, मी चुकले.’ सगळा राजस उन्मत्तपणा, अहंकार हा त्या अश्रूंच्याबरोबर वाहून गेला पण ज्यांचा राजस अहंकार अश्रूंबरोबर वाहून जाईल अशी माणसे या कालखंडामध्ये होती ! संताचे वाचन काळजापर्यंत पोहोचत असे, आणि माणसामध्ये बदल होत असे.

‘मन चंगा तो कटोतीमे गंगा’ तसे समर्थांनी दाखवून दिले तिला ! खरे आहे हे ! म्हणून समर्थ म्हणाले,

‘माई, चित्त थोडे शुध्द करा ना ! जरा तो अहंकार काढा ! माझा उपदेश चित्तामध्ये मावेल, अशी जागा करा ना अंतःकरणामध्ये पहिल्यांदा ! मग उपदेश देतो !’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *