ससा आणि कासव

By | May 20, 2020

कासवाने सशाला धावण्याच्या शर्यतीत हरवले. या अपमानाने ससोबा पांढर्‍याचे अगदी काळेनिळे झाले. ते काही नाही, या अपमानाचा बदला घ्यायचाच. ती डोंगरावर जायची शर्यत लांब पल्ल्याची म्हणून आपल्याला झोप लागली. सहा महिने उलटले. ससोबाने कासवाला जाहीर आव्हान दिले. यावेळी शर्यत लांब पल्ल्याची नव्हे तर शंभर मीटर होणार हे देखील त्याने जाहीर केले. कासवाला इच्छा नसतानाही शर्यतीला हो म्हणावेच लागले.

महिनाभराने शर्यत होणार. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स सगळीकडे हीच बातमी. काहींनी त्यावर कव्हरस्टोरी केली तर काहींनी खास बुलेटीन्स. पेज थ्री पासुन पेज ट्वेल्व्ह पर्यंत फक्त ससा आणि कासव. ही संधी सट्टेवाले कसे सोडतील. जोरदार बेटिंग चालू झाले. ससोबा हॉट फेवरीट! त्यांचा भाव कमी पण कासवाचा भाव एकास दहा.

आणि तो दिवस उजाडला. स्टेडीयम खचाखच भरलेले. दोघांचे पाठीराखे हातात बॅनर्स घेऊन जल्लोष करत होते. शर्यतीला झेंडा दाखवल्यावर स्टेडीयमवर शांतता पसरली. सगळेजण श्वास रोखून पाहू लागले. काही सेकंदात ससोबा फिनिश लाईन पलिकडे होते. कासव पार मागे पडले होते. कासव समर्थक पार निराश झाले आणि ससोबा समर्थकानी ससोबांची मिरवणूक काढली.

दोन दिवस उलटले आणि ‘सबसे तेज’ चॅनेलवर ब्रेकींग न्यूज झळकली.
“डोप टेस्ट पॉजिटीव्ह आल्याने ससोबांचे विजेतेपद काढून घेतले. कासव विजेता घोषित!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *