सिंहाची गुणज्ञता

एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, ‘अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.’ हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, ‘अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.’ हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.

इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, ‘अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.’ सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.

तात्पर्य

– लोचटपणा करून डोके उठविणार्‍या माणसांचा कंटाळा येतो, पण सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *