हरिण आणि द्राक्षाचा वेल

एका हरिणामागे काही शिकारी लागले असता ते एका द्राक्षाच्या वेलापाठीमागे लपून बसले. त्यामुळे त्या शिकार्‍यांना ते दिसेना. म्हणून ते शिकारी निराश होऊन मागे फिरले. ते पाहताच त्या हरणाने त्या वेलाची पाने खाण्यास सुरुवात केली.

त्यामुळे तो वेल हलू लागला. वेल हालत असलेला एका शिकार्‍याने पाहिले व त्याला शंका आली की, येथे एखादे सावज असावे. म्हणून त्याने बरोबर त्याच्या अनुरोधाने आपल्या बंदुकीतील गोळी मारली व हरिण तात्काळ मरण पावले. मरतेवेळी ते आपल्याशी म्हणाले, ‘माझ्या कृतघ्नपणाचं योग्य बक्षीस मला मिळालं. ज्या वेलानं संकटसमयी मला आपल्या पाठीशी घातलं त्याच्यावर मी तोंड टाकावं ही केवढी कृतघ्नता !’

तात्पर्य

– उपकारकर्त्यावरच अपकार करणे ही मोठी कृतघ्नता होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *